तेल अविव/अम्मान – दुष्काळाचा सामना करीत असलेल्या जॉर्डनला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी लांबणीवर टाकला आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि जॉर्डनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नेत्यान्याहू जॉर्डनला पाणीपुरवठा रोखून या देशाची कोंडी करीत आहेत. यामुळे इस्रायल-जॉर्डन शांतीकरार धोक्यात येईल, असा इशारा दोन्ही देशांची माध्यमे देत आहेत.
जॉर्डनमध्ये सध्या पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. १९९४ साली उभय देशांमध्ये झालेल्या शांतीकराराच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलने ‘जॉर्डन रिव्हर’चे पाणी सोडावे, अशी मागणी जॉर्डनने केली होती. इस्रायलच्या अधिकार्यांनी जॉर्डनची सदर मागणी मान्य केली आहे. पण पंतप्रधान नेत्यान्याहू आणि इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिलने सदर निर्णय लांबणीवर टाकल्याचा दावा इस्रायलच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला आहे.
यासाठी गेल्या काही महिन्यांमधील घडामोडी जबाबदार असल्याचे इस्रायली वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी वेस्ट बँकचा काही भूभाग इस्रायलमध्ये सामील करून घेतला होता. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या नेत्यांमध्य संवाद झालेला नाही.
काही दिवसांपूर्वी जॉर्डनचे क्राऊन प्रिन्स हुसेन जेरूसलेममधील टेम्पल माऊंटच्या भेटीवर येणार होते. पण इस्रायलने त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या परवानावरुन मतभेद झाल्यानंतर क्राऊन प्रिन्स हुसेन यांना आपला दौरा रद्द करावा लागला होता. पुढे जॉर्डनने देखील इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या युएई दौर्यासाठी हवाईहद्दीचा वापर करण्यास विलंब लावला होता. या कारणास्तव पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी देखील जॉर्डनला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ताणून धरल्याचा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला आहे. पण यामुळे उभय देशातील शांतीकरार धोक्यात येऊ शकतो, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत.