झाशी – झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जन्मोत्सवानिमित्त झाशीमध्ये ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी संरक्षणदलांच्या शस्त्रांचे प्रदर्शनही भरविण्यात आले असून येथे भारतीय बनावटीच्या स्वार्म ड्रोन्सची विशेष प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. आधुनिक युद्धात स्वार्म ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचे प्रचंड महत्त्व असून काही दिवसांपूर्वीच लष्कराने १०० स्वार्म ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आले होते. तसेच नौदल आणि वायुसेनाही स्वार्म ड्रोन्स खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर झाशीमध्ये एकाच वेळी २५ स्वार्म ड्रोन्सनी हवेत भरारी घेतली. याद्वारे भारताने आपल्या लष्करी सामर्थ्याचेही प्रदर्शन घडविले आहे. अखेरच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रदर्शनाला भेट देणार आहेत.
भारतीय संरक्षणदल नो कॉन्टेक्ट वॉरफेअरसाठी सज्ज होत असून यासाठी महत्त्वाच्या ठरणार्या यंत्रणांचे झाशीतील ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्वा’च्या निमित्ताने सादरीकरण करण्यात आले. तसेच यावेळी एअर शोही आयोजित करण्यात आला होता. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी येथे ठेवलेल्या आधुनिक यंत्रणा, रणगाडे, रायफली व इतर लष्करी तंत्रज्ञानाची पाहणी केली. यावेळी स्वार्म ड्रोनची प्रात्यक्षिके झाली.
याच वर्षी जानेवारी महिन्यात आर्मी डे निमित्त लष्कराने आयोजित केलेल्या संचलनात एकाचवेळी ७५ ड्रोन्सनी उड्डाण करून थरारक प्रत्यक्षिके सादर केली होती. शत्रूच्या धावपट्ट्या, लष्करी चौक्या, रणगाड्यांना या स्वार्म ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा सराव या निमित्ताने करण्यात आला होता व सर्व जगाचे लक्ष याकडे वेधून घेतले होते. चीन स्वार्म ड्रोन तंत्रज्ञानात आपण आघाडीवर घेतल्याचे जगाला दाखवून देत होता. २०१७ साली चीनने एकाचवेळी २०० स्वार्म ड्रोन्सनी प्रत्यक्षिके केली होती. मात्र आर्मी डेच्या निमित्ताने भारताने अशाच प्रकारची क्षमता भारताकडेही असल्याचे दाखवून दिले होते.
बुधवारी झाशीत पुन्हा एकदा भारताने आपल्याकडील या सामर्थ्याचे दर्शन घडविले. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) ही स्वार्म ड्रोन विकसित केली आहे. यावेळी या ड्रोन्सनी आपली क्षमताही दाखवून दिली. सोमवारीच संरक्षणदलप्रमुख बिपीन रावत यांनी नागपूरमध्ये एका कंपनीने विकसित केलेल्या सुसाईड ड्रोन्सच्या प्रोटोटाईपची पाहणी केली होती व यावेळी या सुसाईड ड्रोनची प्रात्यक्षिकेही पार पडली होती. त्यापाठोपाठ झाशीमध्ये डीआरडीओने विकसित केलेल्या स्वार्म ड्रोनची प्रात्यक्षिके पार पडली आहेत.
भारत आपल्याला आवश्यक ६० ते ७० टक्के संरक्षण साहित्य आयात करण्याचा एक काळ होता. मात्र आता परिस्थिती बदलली असून सध्या आपण ३५ टक्के संरक्षण साहित्य आयात करत असून ६५ टक्के साहित्य भारतातच बनत आहे, याकडे यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लक्ष वेधले. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला (हल) ५० हजार कोटी रुपयांच्या ऑर्डर भारतीय संरक्षणदलांकडून मिळाल्या आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचे परिणाम यातून दिसून येतात, असेही संरक्षणमंत्र्यांनी लक्षात आणून दिले.