वॉशिंग्टन/किव्ह – रशियाकडून युक्रेन सीमेनजिक सुरू असलेल्या आक्रमक हालचालींच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने युक्रेनच्या सुरक्षेसाठी अमेरिकी लष्कर तैनात करावे, अशी मागणी अमेरिकी संसद सदस्यांनी केली. संसदेच्या ‘हाऊस आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटी’च्या सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रात युक्रेनला अतिरिक्त शस्त्रास्त्रे तसेच गोपनीय माहिती पुरवावी, अशी आग्रही भूमिकाही घेण्यात आली आहे. दरम्यान, ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी गेल्या आठवड्यात रशियाला युक्रेनजवळ सुरू असलेल्या हालचालींबाबत इशारा दिला होता, असा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात ‘सीएनए’ या अभ्यासगटाने युक्रेन सीमेनजिकच्या रशियन तैनातीची माहिती उघड केली होती. या माहितीत सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले व्हिडिओ तसेच सॅटेलाईट फोटोग्राफ्सचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने त्याला दुजोरा देऊन युक्रेनवरील लष्करी दडपण वाढविण्यासाठी रशियाने ९० हजार जवान तैनात केल्याचा आरोप केला होता. या घटनाक्रमामुळे रशियाच्या आक्रमक कारवायांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या संसद सदस्यांनी केलेली मागणी महत्त्वाची ठरते. ‘युक्रेनच्या सीमेजवरळ रशियन लष्कराची मोठी जमवाजमव सुरू आहे. हे लक्षात घेता अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे तसेच गोपनीय माहिती पुरविण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. रशियाचा हल्ला रोखण्यासाठी अमेरिकेने ब्लॅक सी सागरी क्षेत्रात संरक्षण तैनाती वाढवायला हवी. या क्षेत्रात कायमस्वरुपी तैनातीच्या मुद्यावरही विचार करायला हवा’, अशी मागणी माईक रॉजर्स व माईक टर्नर यांनी केली आहे.
अमेरिकी लष्कर तैनातरॉजर्स व टर्नर हे दोन्ही संसदेच्या ‘हाऊस आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटी’चे सदस्य असल्याने त्यांची मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते. आपल्या पत्रात त्यांनी अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या सहा कोटी डॉलर्सच्या संरक्षणसहाय्याचाही उल्लेख केला आहे. हे सहाय्य पुरविल्यानंतर रशियाने आपल्या हालचाली अधिक वाढविल्याकडेही संसद सदस्यांनी लक्ष वेधले. रशियाची मोठी तैनाती युक्रेनमध्ये नव्या घुसखोरीचे संकेत असू शकतात, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी केलेल्या रशिया दौर्यात युक्रेनचा मुद्दा उपस्थित केल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकन वृत्तवाहिनी ‘सीएनएन’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी युक्रेननजिकच्या हालचालींवरून रशियन अधिकार्यांना इशारा दिल्याचा दावा कर ण्यात आला आहे.