आवश्यकता भासल्यास पूर्व लडाखमधील तैनाती वाढविली जाईल

- वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांचा इशारा

हैदराबाद – भारत-चीन एलएसीवरील तणावकायम असून आवश्यकता भासल्यास या क्षेत्रातील तैनाती वाढविण्यात येईल, असा इशारा वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी दिला. या भागात सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झाली होती, पण ती पूर्ण झालेली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी एका प्रश्‍नाला उत्तर देताना, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ची प्रक्रिया योग्यरित्या पार पडेल, असा विश्‍वासही एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी व्यक्त केला.

आवश्यकता भासल्यास पूर्व लडाखमधील तैनाती वाढविली जाईल - वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांचा इशाराशनिवारी दुंडिगलमधील एअरफोर्स ऍकॅडमीत पार पडलेल्या ‘कम्बाईन्ड् ग्रॅज्युएशन परेड’च्या सोहळ्याला वायुसेनाप्रमुख उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना व्ही. आर. चौधरी यांनी एलएसीमधील तैनातीसंदर्भात माहिती दिली. गलवान खोर्‍यात झालेल्या संघर्षानंतर भारताने एलएसीमधील तैनातीत प्रचंड प्रमाणात वाढ केली होती. कारण चीनने भारतीय लष्करावर दडपण टाकण्यासाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले होते. तोडीस तोड तैनाती करून भारतीय लष्कराने चीनला प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी भारतीय वायुसेनेने देखील गलवानमधील संघर्षानंतर एलएसीच्या हवाईक्षेत्रातील हालचाली वाढविल्या होत्या. भारतीय वायुसेना या क्षेत्रात वर्चस्व गाजवित असल्याचे त्यावेळचे वायुसेनाप्रमुख आरकेएस भदौरिया म्हणाले होते.

या पार्श्‍वभूमीवर, आवश्यकता भासल्यास वायुसेना अधिक तैनाती करील, अशी घोषणा नवे वायुसेनाप्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी केली. याबाबत अधिक तपशील आपण शकणार नाही, पण सूचना मिळाल्यानंतर अल्पावधितच वायुसेना कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज असेल, अशी ग्वाही वायुसेनाप्रमुखांनी दिली. दरम्यान, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी सुरू झाली असून ही प्रक्रिया योग्यरितीने पार पडेल, असे वायुसेनाप्रमुख पुढे म्हणाले. मात्र यासाठी आणखी काही आठवडे लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.

leave a reply