अमेरिकेतील महागाईच्या मुद्यावर राष्ट्राध्यक्ष बायडेन व ‘फेडरल रिझर्व्ह’मध्ये मतभेद

वॉशिंग्टन – अमेरिकेत भडकलेल्या महागाईच्या मुद्यावर राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन व ‘फेडरल रिझर्व्ह’मधील मतभेद समोर आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बुधवारी एक ट्विट करून देशातील वाढत्या महागाईमागे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन असल्याचा आरोप केला. बायडेन यांच्या वक्तव्यापूर्वी काही तास आधी फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी, अमेरिकेतील महागाई आधीपासून वाढत असून त्यासाठी रशियाला जबाबदार धरणे चुकीचे आहे, असे संसदेत झालेल्या सुनावणीत सांगितले होते.

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेतील महागाई सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित करीत आहे. मार्च, एप्रिल व मे अशा सलग तीन महिन्यांमध्ये अमेरिकेतील महागाई निर्देशांक आठ टक्क्यांहून अधिक नोंदविण्यात आला. अमेरिकेच्या इतिहासात ही 1981 सालानंतरची सर्वाधिक वाढ ठरली आहे. इंधन, घरांच्या किंमती, ऊर्जा, कपडे, अन्नधान्ये, भाज्या यासह सर्वच जीवनावश्यक उत्पादनांच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. इंधनाचे दर तब्बल 50 टक्क्यांनी उसळले असून वीजेच्या बिलांमध्ये 30 टक्क्यांहून अधिक भर पडली आहे. घरांच्या किंमतीत 20 टक्क्यांहून अधिक तर घरभाड्यात चार टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

सुरुवातीच्या काळात बायडेन प्रशासनाने वाढत्या महागाईचा मुद्दा फारशा गांभीर्याने घेतला नव्हता. काही महिन्यांपूर्वी अर्थमंत्री येलेन तसेच फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी महागाई तात्पुरती असल्याची वक्तव्ये केली होती. मात्र अमेरिकेतील महागाईचा भडका सातत्याने वाढत असून मध्यमवर्गीय अमेरिकी कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे फेडरल रिझर्व्हसह अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी महागाईच्या मुद्याची गांभीर्याने दखल घेणे भाग पडले आहे.

पण त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन मात्र वास्तव स्वीकारण्यास तयार नसून वाढत्या महागाईसाठी सातत्याने रशियाला लक्ष्य करीत आहेत. अवघ्या काही तासांच्या अवधीत झालेल्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे बायडेन प्रशासनात महागाईसारख्या गंभीर मुद्यावर योग्य समन्वय नसल्याचेही दिसून येते. पाश्चिमात्य देशांकडून होणाऱ्या आरोपांविरोधात रशियन राष्ट्राध्यक्षांनी कडक शब्दात सुनावले होते.

‘युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य देशांनी रशियाच्या इंधनक्षेत्राची कोंडी करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मात्र त्यामुळे रशियाचे मोठे नुकसान होण्याऐवजी अमेरिका व युरोपिय देशांनाच मोठे धक्के बसले आहेत. या देशांमध्ये इंधनाच्या दरांसह महागाई विक्रमी स्तरावर भडकली असून त्याचा सर्वाधिक त्रास सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. मात्र या देशांमधील सत्ताधारी याचे खापर रशियावर फोडून मोकळे झाले आहेत. प्रत्यक्षात यासाठी पाश्चिमात्य देशांची चुकीची धोरणे जबाबदार आहेत’, असे पुतिन यांनी म्हटले होते.

leave a reply