रशिया व तुर्कीकडून पाकिस्तानचा भ्रमनिरास

इस्लामाबाद – चीनमध्ये होणार्‍या विंटर ऑलिंपिकसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मिळालेल्या आमंत्रणामुळे उत्साह वाढलेल्या पाकिस्तानने बीजिंगमध्ये रशियाबरोबर द्विपक्षीय चर्चा पार पडेल, असे दावे केले होते. बीजिंगमध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या होणारी ही चर्चा ऐतिहासिक असेल, असा विश्‍वास पाकिस्तानात व्यक्त करण्यात येत होता. पण राष्ट्राध्यक्ष पुतिन विंटर ऑलिंपिकसाठी चीनमध्ये जाणार असले तरी ते कुठल्याही देशाशी द्विपक्षीय चर्चा करणार नाहीत, असे रशियाने जाहीर केले. यामुळे पाकिस्तानची घोर निराशा झाली आहे.

रशिया व तुर्कीकडून पाकिस्तानचा भ्रमनिरासभारताचे अमेरिकेबरोबरील धोरणात्मक सहकार्य वाढत चालले आहे. त्याचवेळी भारताने रशियाबरोबरील आपले मैत्रिपूर्ण संबंध कायम राखले आहेत. भारताच्या या स्वतंत्र परराष्ट्र धोरणापासून पाकिस्तानच्या सरकारने धडे घ्यावे, अशी टीका या देशातील पत्रकार व माध्यमांमधून केली जाते. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सत्तेवर आल्यापासून पाकिस्तानच्या पंतप्रधानांना साधा फोन करण्याचीही तसदी घेतलेली नाही, याकडे पत्रकार व माध्यमे लक्ष वेधत आहेत. आपल्यावर होणारी ही टीका टाळण्यासाठी इम्रान खान यांचे सरकार रशियाबरोबर संबंध विकसित करण्यासाठी धडपडत आहे.

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला भेट द्यावी, यासाठी पाकिस्तानचे सरकार प्रयत्न करीत होते. पण रशियन राष्ट्राध्यक्षांनी त्याला दाद दिलेली नाही. अशा परिस्थितीत बीजिंगमध्ये होणार्‍या विंटर ऑलिंपिकदरम्यान पंतप्रधान इम्रान खान रशियन राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करतील, असा विश्‍वास पाकिस्तानात व्यक्त करण्यात येत होता. मात्र रशियाच्या क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची बीजिंगमध्ये द्विपक्षीय चर्चा ठरलेली नसल्याचे सांगून पाकिस्तानला धक्का दिला. यामुळे रशिया आपल्या बाजूने असल्याचे संकेत देऊ पाहणार्‍या पाकिस्तानच्या सरकारचा भ्रमनिरास झाला आहे.

रशियाच्या आधी तुर्कीनेही पाकिस्तानला मोठा धक्का दिल्याचे दिसत आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पाकिस्तानचे पाठिराखे असून दोन्ही देश मिळून इस्लामी जगताचे नेतृत्त्व करू शकतात, असे दावे पाकिस्तानात केले जात होते. तुर्कीबरोबरील सहकार्यासाठी पाकिस्तानने सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीबरोबरील संबंध पणाला लावले होते. या देशांकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. पण आता तुर्कीच्या राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनीच इस्रायलबरोबर सहकार्यासाठी पुढाकार घेतला असून ते लवकरच इस्रायलच्या दौर्‍यावर जाणार आहेत. तुर्कीशी सहकार्य करून इस्लामी देशांचा स्वतंत्र गट तयार करण्याची व त्याचे नेतृत्त्व करण्याची स्वप्ने पाहणार्‍या पाकिस्तानसाठी हा फार मोठा धक्का ठरतो.

तुर्कीबरोबरील सहकार्यासाठी पारंपरिक मित्रदेशांना दुखावणार्‍या पंतप्रधान इम्रान खान यांच्या अपरिपक्व परराष्ट्र धोरणाचा हा आणखी एक पुरावा असल्याचे त्यांचे टीकाकार सांगू लागले आहेत. यामुळे इम्रान खान यांना परराष्ट्र धोरणातले काहीच कळत नाही, हा आरोप सिद्ध झाल्याची टीका एकेकाळी त्यांची बाजू उचलून धरणारे पत्रकारही करू लागले आहेत. त्यातच तुर्की भारताला अत्याधुनिक ड्रोन पुरविण्याची तयारी करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. याने पाकिस्तानी विश्‍लेषक आणि माध्यमांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या विरोधात गेलेले पाकिस्तानातील वातावरण अधिकच तापले आहे.

leave a reply