चीनमधील लांबलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांमध्ये असंतोष वाढला

बीजिंग/शांघाय – चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनला होणारा विरोध खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र या इशाऱ्यानंतरही लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या चीनच्या जनतेने आपला असंतोष सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करीत सरकारच्या धोरणांवर उघड नाराजी दर्शविण्यास सुरुवात केली आहे. यात सामान्य नागरिकांसह प्राध्यापक, वकिल व आरोग्यतज्ज्ञांचाही समावेश आहे. सातत्याने लांबणाऱ्या लॉकडाऊनविरोधातील पत्र, लेख व व्हिडिओज्‌‍ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. जनतेतील या वाढत्या नाराजीमुळे चीनच्या राजकीय वर्तुळातही अस्वस्थता निर्माण झाल्याचे दावे पाश्चिमात्य माध्यमे तसेच विश्लेषक करीत आहेत.

कोरोना साथीचा उगम असलेल्या चीनमध्ये पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये चीनमध्ये 28 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी चीनच्या सत्ताधारी राजवटीने पुन्हा एकदा लॉकडाऊनची व्याप्ती वाढविली आहे. गेल्या दोन महिन्यात कम्युनिस्ट राजवटीने आघाडीचे शहर असलेल्या शांघायमधील निर्बंध दोनदा शिथिल केले होते. मात्र आता सोमवारपासून पुन्हा एकदा शांघायमध्ये ‘झीरो कोविड पॉलिसी’अंतर्गत कठोर निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे.

शांघायमधील 16 उपविभागांपैकी चारमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या भागातील नागरिकांना नोटीस पाठविण्यात आली आहे, तसेच रस्त्यावरून मेगाफोनच्या माध्यमातून ‘गो होम’चे आदेश देण्यात येत आहेत. रुग्ण आढळलेल्या भागांमधील घरांमध्ये जबरदस्तीने जंतुनाशकांची फवारणी करण्यात येत असून नागरिकांवर घराच्या किल्ल्या प्रशासकीय पथकांच्या ताब्यात देण्याची जबरदस्ती करण्यात येत आहे. काही भागांमध्ये रुग्णांना जबरदस्तीने क्वारंटाईन केंद्रात घेऊन जात असल्याचे व्हिडिओदेखील प्रसिद्ध झाले आहेत. टेस्ला कंपनीच्या एका फॅक्टरीत स्थानिक कर्मचारी व सुरक्षायंत्रणांमध्ये झटापट झाल्याचे वृत्तही समोर आले आहे.

अशा घटनांवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. ‘ईस्ट चायना युनिव्हर्सिटी’तील प्राध्यापक टाँग झ्वेई यांनी कोरोनाविरोधातील प्रशासकीय उपाययोजनांवर नाराजी व्यक्त करणारा लेख प्रसिद्ध केला आहे. शांघायमधील कोरोना रुग्ण व नागरिकांना ज्या रितीने वागणूक देण्यात येत आहे, ती केवळ आणीबाणीच्या काळात समर्थनीय असू शकते, अशी टीका टाँग यांनी केली. आपल्याला विविध सहकारी तसेच हितचिंतकांकडून प्रशासनाच्या कारवायांची माहिती मिळाल्याचेही त्यांनी लेखात सांगितले आहे.

चीनमधील आघाडीच्या लॉ फर्ममध्ये काम करणाऱ्या लिऊ डॅलि या वकिलांनी थेट प्रशासनाला उद्देशून पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. यात त्यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवायांवर आक्षेप नोंदविले आहेत. टाँग तसेच लिऊ यांना चीनमधील सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मात्र त्यानंतर चीनच्या सत्ताधाऱ्यांनी दोन्ही लेखांवर बंदी टाकली आहे. बंदी असतानाही काही जण स्क्रीनशॉट्सच्या माध्यमातून दोन्ही लेख प्रसिद्ध करीत असल्याचे समोर येत आहे.

चीनमध्ये सध्या राजधानी बीजिंग व शांघायसह जवळपास 10हून अधिक आघाडीच्या शहरांमध्ये ‘झीरो कोविड पॉलिसी’नुसार निर्बंध लादण्यात आले आहेत. यात नागरिकांच्या सातत्याने चाचण्या घेणे तसेच त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे यांचा समावेश आहे. चीनमधील अनेक आघाडीच्या परदेशी कंपन्यांचे काम खंडित झाले असून त्याचा फटका जागतिक स्तरावरील पुरवठा साखळीला बसला आहे. त्याचवेळी लॉकडाऊनमुळे चीनमधील मागणी घटल्याने इंधनाच्या दरांमध्येही घसरण झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

leave a reply