किबुत्झ – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर इराणबरोबरचा अणुकरार पुन्हा सक्रीय करण्याचे संकेत देणाऱ्या ज्यो बायडेन यांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे. ‘इराणबरोबरच्या अणुकरारात पुन्हा सामिल होऊ नका. इस्रायल इराणला कदापि अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही’, अशी घोषणा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केली.
इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी थेट उल्लेख टाळून बायडेन यांना इराणबाबतच्या भूमिकेवरुन कठोर शब्दात फटकारले. इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी कठोर भूमिका घ्यावीच लागेल, असे पंतप्रधान नेत्यान्याहू म्हणाले. आत्ताच्या भूमिकेपासून माघार घेऊन इराणबरोबरच्या जुन्या अणुकरारात पुन्हा सहभागी होऊ नका, असे सांगून इस्रायलच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर येण्याची तयारी करीत असलेल्या बायडेन यांना इशारा दिल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.
त्याचबरोबर इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी स्वीकारलेल्या भूमिकेमुळे अरब देशांनी देखील त्यांच्या इस्रायलबाबतच्या मूळ भूमिकेत बदल केल्याची आठवण नेत्यान्याहू यांनी करून दिली.
20 जानेवारी 2021 रोजी बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर काही दिवसातच बायडेन इराणवरील निर्बंध मागे जुन्या अणुकरारात अमेरिका सामील होत असल्याची घोषणा करतील, असा दावा केला जातो. इराणने देखील बायडेन यांच्याकडून अणुकराराच्या जुन्या अटी पूर्ण केल्या जातील, अशी अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. त्यापार्श्वभूमीवर, इस्रायली पंतप्रधानांनी बायडेन यांना हा इशारा दिल्याचे दिसत आहे.