मुलांची हत्या करणाऱ्या इराणच्या राजवटीला पाठिंबा देऊ नका

- खामेनी यांच्या भाचीचे पाश्चिमात्य देशांना आवाहन

इराणच्या राजवटीला पाठिंबातेहरान – ‘स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या जगभरातील नागरिकांनो, या कठीण काळात इराणच्या जनतेसोबत उभे रहा. मुलांची हत्या घडविणाऱ्या इराणच्या राजवटीला पाठिंबा देऊ नका, असे आपल्या देशाच्या सरकारला आवाहन करा. कारण इराणची ही राजवट त्यांच्या धार्मिक मुल्यांशी प्रामाणिक नाही. बळाचा वापर करून सत्ता हातात ठेवणे, याशिवाय कुठलाही नियम या राजवटीला ठाऊक नाही’, अशी जळजळीत टीका इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांची भाची फरीदेह मोरादखानी यांनी केली. यानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी फरीदेह यांना ताब्यात घेतले आहे.

इराणमध्ये हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना राजकीय स्तरातून मिळणारा पाठिंबा वाढत चालला आहे. याआधी इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष रफ्संजानी यांची मुलगी व इराणमधील धार्मिक नेत्यांनी निदर्शकांचे समर्थन केले होते. इराणच्या राजवटीने निदर्शकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, असे आवाहन सुन्नीपंथियांच्या नेत्यांनी केले होते. पण इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आणि सर्वाधिकार हाती असलेले आयातुल्ला खामेनी यांच्या भाचीनेच निदर्शकांची बाजू उचलून धरत इराणच्या राजवटीवर गंभीर आरोप केले आहेत.

फरीदेह मोरादखानी यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच राजवट व रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सवर ताशेरे ओढले. इराणच्या राजवटीने मुलांची हत्या घडविल्याचा ठपका फरीदेह यांनी ठेवला. आपल्याच जनतेशी प्रामाणिक नसणाऱ्या इराणमधील राजवट उलथण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सहाय्य करावे, असे आवाहन फरीदेह यांनी केले. इराणच्या राजवटीला लक्ष्य करणाऱ्या फरीदेह यांना २३ नोव्हेंबर रोजीच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सन ताब्यात घेतले होते. त्याआधी फरीदेह यांचा हा व्हिडिओ फ्रान्समध्ये राहत असलेला त्यांच्या भावाने सोशल मीडियावर अपलोड केला.

इराणच्या राजवटीला पाठिंबाइराणच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून खामेनी यांच्याविरोधातील घोषणांची तीव्रता वाढली आहे. गेल्या दहा आठवड्यांमध्ये इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी निदर्शकांवर केलेल्या कारवाईत ४५० जणांचा बळी गेला असून यामध्ये ६३ मुलांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. तर १८ हजारांहून अधिक जणांना इराणने ताब्यात घेतले आहे. याआधीही इराणमध्ये राजवटविरोधात निदर्शने भडकली होती. पण महिनाभराहून अधिक काळ ही निदर्शने टिकली नव्हती. मात्र यावेळच्या निदर्शनांनी इराणमधील राजवटीची कंबर मोडल्याचा दावा केला जातो.

त्यातच इराणमध्ये राजकीय प्रभाव असलेल्या फरीदेह यांच्यासारखी मंडळी निदर्शकांच्या बाजूने उभे राहत आहेत. इराणच्या चित्रपटसृष्टीतील महिला कलाकारांनी देखील हेडस्कार्फ काढून निदर्शकांना समर्थन दिले. तर इराणच्या खेळाडूंनी देखील निदर्शकांना पाठिंबा दिला आहे. इराणचे पोलीसदल, रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स, बसिज मिलिशिया निदर्शकांवर कठोर कारवाई करून निदर्शने मोडून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांनी निदर्शकांना धमकावले आहे.

इराणच्या जनतेने निदर्शनांध्ये सामील होऊन अस्थैर्य माजवू नये. अन्यथा या निदर्शनात सहभागी झालेल्या सरसकट सर्वांवर कारवाई करावी लागेल, असे सलामी यांनी बजावले. निदर्शनांमध्ये सामील होऊन तुम्ही इराणविरोधक पाश्चिमात्यांच्या गटात सामील होत असल्याचा आरोप सलामी यांनी केला. रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या प्रमुखांनी दिलेल्या या इशाऱ्यातून इराणला वाटत असलेली चिंता उघड होत असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे म्हणणे आहे.

leave a reply