तैपेई/बीजिंग – रशियाने युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर चीन तैवानला लक्ष्य करेल, अशी जोरदार चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, तैवान व युक्रेनची तुलना करु नका, असे आवाहन तैवान सरकारकडून करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी चीननेही तैवान म्हणजे युक्रेन नाही, असा इशारा दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
रशिया-युक्रेन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया व चीनमधील जवळीक अधिक वाढताना दिसत आहे. चीनने युक्रेनच्या मुद्यावर रशियाला समर्थन दिले असून रशियानेही तैवान प्रकरणात चीनला पाठिंबा दिला होता. यावर तैवानकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता देऊन युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यानंतर तैवानची काळजी अधिकच वाढली आहे. चीन रशियाचे अनुकरण करून तैवानविरोधात कारवाईचे पाऊल उचलेल, असे दावे तैवानमधून करण्यात येत आहेत.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियावर ‘टुडेज् युक्रेन इज टुमारोज् तैवान’ अशा स्वरुपाचे इशारे दिले जात आहेत. याची गंभीर दखल तैवान सरकारने घेतली आहे. ‘सर्वच बाबींचा विचार करता, तैवान व युक्रेन या दोन देशांची तुलना होऊ शकत नाही. दोन देशांचा संबंध जोडणारे तैवान व युक्रेनमधील स्थितीची तुलना करून चुकीचा संदेश पसरवित आहेत. नागरिकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी अशा प्रकारच्या तुलनेला प्रोत्साहन दिले जात आहे’, अशी नाराजी तैवानचे प्रवक्ते लो पिंग-चेंग यांनी केली.
काही दिवसांपूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही तैवान-युक्रेन तुलना न करण्याचा इशारा दिला होता. चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी, तैवान चीनचा अविभाज्य भाग असून त्याची तुलना युक्रेनशी करता येणार नाही, असे बजावले होतेे. चीन आपल्या अखंडतेशी कधीही तडजोड करणार नाही, असा इशाराही चिनी प्रवक्त्यांनी दिला होता. चिनी मुखपत्रानेही याबाबत आक्रमक इशारा दिला होता.
अमेरिकेतील काही कट्टरपंथी राजकारणी युक्रेनमधील संघर्षाचा फायदा घेऊन तैवानबाबत नवे संकट निर्माण करीत आहेत, तसेच तैवानमधील विघटनवादी गटांना मजबूत करीत असल्याचा ठपका चिनी मुखपत्राने ठेवला होता.