आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांसाठी पूर्व आफ्रिका स्वर्ग ठरेल

- पोर्तुगालच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

पूर्व आफ्रिकाब्रुसेल्स – नैसर्गिक इंधनाने संपन्न असलेल्या पूर्व आफ्रिकी देशांमधील वाढता दहशतवाद वेळीच नियंत्रणात आणला पाहिजे. अन्यथा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांसाठी पूर्व आफ्रिकी देश सुरक्षित स्वर्ग ठरतील, असा इशारा पोर्तुगालचे परराष्ट्रमंत्री ऑगस्टो सँटोस सिल्वा यांनी दिला. युरोपियन संसदेत बोलताना पोर्तुगालच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आफ्रिकेतील दहशतवादाविरोधात युरोपिय महासंघाच्या सहाय्याची मागणी केली.

गेल्या आठवड्यात पोर्तुगालच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पूर्व आफ्रिकेतील मोझांबिक या देशाचा दौरा केला होता. या दौर्‍यात सँटोस यांनी मोझांबिकची राजधानी मापूटोला भेट दिली तसेच या देशातील दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवायांची माहिती घेतली. पूर्व आफ्रिकाआपल्या या भेटीची माहिती युरोपियन संसदेसमोर मांडताना मोझांबिकला महासंघाच्या सहाय्याची मोठी आवश्यकता असल्याचे सांगितले.

याआधी युरोपिय महासंघाने मोझांबिकला मानवतावादी सहाय्य पुरविले आहे. तसेच येथील विकासप्रकल्पांसाठी महासंघाने मदत केली आहे. पण मोझांबिकच्या सुरक्षेबाबतही महासंघाने गांभीर्याने विचार करायला हवा, असे आवाहन सँटोस यांनी केले. दहशतवादविरोधी कारवाईसाठी युरोपिय महासंघाने मोझांबिकच्या सुरक्षादलांना आवश्यक त्या शस्त्रास्त्रांचा पुरवठा करावा, असे पोर्तुगालच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सुचविले.पूर्व आफ्रिका

नैसर्गिक वायूने संपन्न असलेल्या मोझांबिक आणि इतर पूर्व आफ्रिकी देशांची सुरक्षा ही युरोपिय महासंघाच्या हिताची असल्याचा दावा सँटोस यांनी केला. महासंघाने मोझांबिकला दहशतवादविरोधी कारवाईसाठी सहाय्य केले तर येथील दहशतवाद्यांना आपला प्रभाव वाढविणे कठीण होईल. अन्यथा मोझांबिक बरोबर पूर्व आफ्रिकी देश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांसाठी स्वर्ग ठरेल. या भागात जगभरातील आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना तळ ठोकतील, असा इशारा पोर्तुगालच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला.

दरम्यान, मोझांबिकमधील नैसर्गिक वायुच्या उत्खननासंदर्भात युरोपिय महासंघाने या पूर्व आफ्रिकी देशाशी सहकार्य करार केले आहेत. टोटल आणि एक्सॉन मोबिल या इंधननिर्मिती क्षेत्रातील युरोपिय कंपन्यांनी मोझांबिकमध्ये गुंतवणूक केली आहे.

leave a reply