पॅरिस – 2018 साली आलेल्या ‘बीस्ट फ्रॉम द ईस्ट’ सारखी कडाक्याची थंडी पसरविणारी शीतलहर युरोपमध्ये दाखल होईल. अशा परिस्थितीत युरोपिय देशांना इंधनवायूची फार मोठी गरज भासेल. पण युरोपिय देशांना इंधनाचा पुरवठा करणारा रशिया मात्र याचा फायदा घेऊन राजकीय हत्यारासारखा इंधनवायूचा वापर करील. युरोपिय देशांना याचा फार मोठा धोका संभवतो, असा इशारा ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी-आयईए’ने दिला आहे. मुख्य म्हणजे हिवाळ्यात इंधनवायूचा पुरवठा पूर्णपणे बंद करून रशिया युरोपिय देशांना जेरीस आणण्याची शक्यता आयईएने नाकारलेली नाही.
युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर, युरोपिय देशांनी रशियाच्या विरोधात भूमिका स्वीकारील होती. मात्र इंधनवायुसाठी युरोपिय देश रशियावर अवलंबून आहेत. अमेरिकेने रशियाच्या डॉलरमधील व्यवहारांवर निर्बंध लादल्यानंतर, रशियाने रुबलमध्ये बिल चुकते करणाऱ्या देशांनाच इंधनवायू पुरविला जाईल, असे बजावले होते. याचे पालन न करणाऱ्या देशांचा इंधनवायू पुरवठा रशियाने कमी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा परिस्थितीत समोर खड्या ठाकलेल्या कडक हिवाळ्यात युरोपिय देशांची अवस्था अधिकच बिकट होणार असल्याचे दावे केले जात आहेत.
हिवाळ्यात घरातील उब कायम ठेवण्यासाठी युरोपिय देशांमध्ये हिटरचा वापर केला जातो. म्हणूनच या काळात युरोपिय देशांमध्ये इंधनवायूची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. युरोपिय देश काही काळ आधीच ही अतिरिक्त मागणी लक्षात घेऊन इंधनवायूचा पर्याप्त साठा करून ठेवतात. यावर्षी मात्र हा साठा पुरेशा प्रमाणात नसून तो 90 टक्के इतकाच असल्याची बाब आयईएने लक्षात आणून दिली. युक्रेनच्या युद्धामुळे युरोपिय देश पुरेशा प्रमाणात इंधनवायूचा साठा करू शकले नाहीत. त्याचवेळी रशियानेही युरोपिय देशांच्या इंधनाच्या पुरवठ्यात जाणीवपूर्वक कपात केली, असा दावा आयईएने केला.
2018 सालाप्रमाणे यावर्षी युरोपला शीतलहरीचा सामना करावा लागेल. त्यामुळे यावर्षी युरोपमधील हिवाळा कडक असून याला तोंड देण्यासाठी अधिक प्रमाणात गॅसचा वापर होईल. त्याचा पर्याप्त साठा नसल्याने युरोपिय देशांना फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. युक्रेनच्या युद्धात आपल्याविरोधात भूमिका स्वीकारणाऱ्या युरोपिय देशांची कोंडी करण्यासाठी रशिया युरोपिय देशांचा इंधनपुरवठा पूर्णपणे खंडीत करण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशारा देऊन आयईएने युरोपिय देशांची झोप उडविली आहे.
दरम्यान, रशियाने नार्ड स्ट्रीम 2 या युरोपिय देशांना इंधनाचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये स्फोट घडवून आणल्याचा आरोप झाला होता. अमेरिकेने यासाठी रशियाला धारेवर धरले होते. पण अब्जावधी डॉलर्सचा खर्च करून उभारलेली ही पाईपलाईन रशिया कशासाठी उडवून देईल? असा सवाल करून रशियाने याला अमेरिकाच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना, युरोपसमोर हिवाळ्यासाठी आवश्यक असलेल्या इंधनवायूचा पर्याप्त साठा उभा करण्याचे आव्हान खडे ठाकल्याचे दिसत आहे.