भारतीय अर्थव्यवस्थेत तेजी परतल्याचा तज्ज्ञांचा दावा

- 'पीएमआय' निर्देशांकामध्ये १३ वर्षातील सर्वाधिक वाढ

तेजीनवी दिल्ली – कोरोनाच्या संकटाशी सामना केल्यानंतर आता पुन्हा तेजी परतत असून भारतीय अर्थव्यवस्था गती पकडण्याच्या तयारीत असल्याचा दावा, तज्ज्ञांनी केला आहे. गेल्या दोन दिवसात अर्थव्यस्थेतबाबत शुभसंकेत देणाऱ्या काही बातम्यांकडे या तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. देशाचा ‘पीएमआय’ इंडेक्समध्ये सलग तिसऱ्या महिन्यात वाढ नोंदविण्यात आली असून उत्पादनात १३ वर्षातील सर्वाधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच वाहन विक्रीमध्ये सुधारणा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यातील ‘जीएसटी’ महसूल वाढला आहे. तसेच सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लवकरच दुसरे आर्थिक पॅकेज जाहीर करू शकते, असे संकेत केंद्रीय अर्थ सचिवांनी दिले आहेत.

देशाच्या ‘जीएसटी ‘महसूल आठ महिन्यात पहिल्यांदाच एक लाख कोटींच्या पुढे गेल्यानंतर ‘पीएमआय’ निर्देशांकाच्या बातमीने गुंतवणूकदरांमधील उत्साह वाढविला आहे. मार्किट ग्रुपने जाहीर केलेल्या ‘पर्चेसिंग मॅनेजमेन्ट इंडेक्स’नुसार (पीएमआय) देशातील उतपादन आणि मागणीत वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात ही वाढ नोंदविण्यात आली असून सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ही वाढ गेल्या तेरा वर्षातील सर्वाधिक वाढ असल्याचा दावा, अहवालात करण्यात आला आहे.

तेजी

‘पीएमआय’ निर्देशांक हा देशाच्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील आर्थिक ट्रेंड दर्शवतो. दर महिन्याला कंपन्यांचे सर्वेक्षण करून हा निर्देशांक काढला जातो. हा निर्देशांक ५० पेक्षा खाली असल्यास अर्थव्यवस्था आकुंचन पावत असल्याचे आणि ५० पेक्षा जास्त असल्यास अर्थव्यवस्था विस्तारात असल्याचे दर्शवतो. ऑक्टोबरमध्ये ‘पीएमआय’ निर्देशांक ५८.९ इतका नोंदविण्यात आला, तर सप्टेंबरमध्ये ‘पीएमआय’ ५६.८ इतका होता.

‘कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेले अडथळे आणि अडचणी दूर होत असून मागणी वाढत आहे. त्यामुळे उत्पादकांकडे नव्या ऑर्डर्स येत आहेत आणि उत्पादन वाढत आहे. विक्रीतील वाढ पुढील काही महिने अशीच टिकून राहील असा कंपन्यांना विश्वास वाटत आहे. ही गोष्ट कंपन्यांच्या उत्पादनांसाठी आवश्यक खरेदीच्या नोंदीवरून स्पष्ट होते’, असे ‘आयएचएस मार्किट’च्या अर्थतज्ज्ञ आणि सहसंचालिका पोलीअन्ना डे लीमा यांनी म्हटले आहे.

तेजी

देशातील वाहन क्षेत्रात मागणी वाढत आहे. व्यावसायिक वाहने आणि दुचाकींची विक्री वाढली आहे, असे आणखी एका अहवालातून स्पष्ट होत आहे. हिरो मोटो, टीव्हीएस, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हुंदाई या कंपन्यांच्या वाहनांची विक्री गेल्यावर्षीच्या उत्सव काळाच्या तुलनेत वाढली आहे. तसेच इंधन तेलाची मागणीही लॉकडाऊन पूर्वीच्या स्थितीत पोहोचल्याचे दिसून येत आहे.

यापार्श्वभूमीवर भारतीय उद्योगांची प्रमुख संघटना असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री’च्या (फिक्की) प्रमुख संगीत रेड्डी यांनी भारतीय अर्थव्यवस्था अधिक गतीने विकास करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. ‘कोरोनाच्या संकटानंतर जगभरात जीवन आणि उपजीविका वाचविण्यात समतोल कसा साधायचा असा पेच दिसून आला. मात्र भारताने ‘लॉकडाऊन’ केल्यावर आरोग्य पायभूत सुविधा मजबूत केल्या आणि जीवन वाचविण्यावर भर दिला. हा मार्ग खूपच उपयुक्त ठरला. आता उपजीविकेसाठी सरकारला काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील, असे रेड्डी म्हणाल्या.

तेजी

”सरकारने आर्थिक धोरणात सुधारणांसाठी, तसेच अर्थव्यस्था विस्तरण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यास तयार असल्याचे दाखवून दिले आहे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. आता विकासाला गती देण्यासाठी आणखी धाडसी निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे”, असे रेड्डी म्हणाल्या.

दरम्यान, केंद्रीय अर्थ सचिव अजय भूषण पांडे यांनी अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत असल्याचे संकेत मिळत असल्याचे म्हटले आहे. जीएसटी महसूलात वाढ त्याचे चांगले उदाहरण आहे. तसेच सरकारचा कर वाढविण्याचा कोणताही विचार नाही, असेही पांडे यांनी स्पष्ट केले. हॉटेल, पर्यटनासारखी क्षेत्रे प्रचंड अडचणीत आहेत. याचा सरकारला पूर्ण अंदाज असून पुढील पॅकेजमध्ये अडचणीत असलेल्या क्षेत्रांवर अधिक भर दिला जाईल,असे पांडे एका मुलाखतीत म्हणाले.

leave a reply