जेरूसलेम – अमेरिकेकडून प्रगत शस्त्रास्त्रे खरेदी करणार्या संयुक्त अरब अमिरातला (युएई) इस्रायलचा विरोध नसेल, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी केली. दोन्ही इस्रायली नेत्यांनी उघडपणे उल्लेख केला नसला तरी ‘युएई’च्या ‘एफ-३५’ विमानांच्या खरेदीला इस्रायलने सहमती दिल्याचे उघड होत आहे. तर अरब देशांशी शस्त्र सहकार्य करताना इस्रायलच्या सुरक्षेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिका ‘युएई’ला अतिप्रगत लढाऊ विमान पुरविण्यास तयार झाली असली तरी कतारबाबतचा निर्णय अमेरिकेने राखून ठेवल्याची माहिती समोर येत आहे.
सप्टेंबर महिन्यात इस्रायल आणि युएईमध्ये ऐतिहासिक सहकार्य प्रस्थापित झाले आहेत. गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत उभय देशांमध्ये व्हिसा सेवा, पर्यटन तसेच इंधन सहकार्याबरोबर इतर करार पार पडले आहेत. मात्र अमेरिकेकडून युएईला देण्यात येणार्या ‘एफ-३५’ या स्टेल्थ लढाऊ विमानांच्या विक्रीला इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी कडाडून विरोध केला होता. इस्रायली हवाई दलाच्या ताफ्यात ‘एफ-३५’ विमानांचे पथक असून आखातातील इतर देशांकडे ही अतिप्रगत लढाऊ विमाने नसावी, अशी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांची भूमिका होती.
मात्र गेल्या आठवड्यात अमेरिकेमध्ये इस्रायल आणि युएईच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांनी गांत्झ यांना इस्रायलच्या सुरक्षेबाबत आश्वस्त केल्याची माहिती समोर येत आहे. युएई, बहारिन या देशांना प्रगत शस्त्रास्त्रे पुरविली तरी अमेरिका इस्रायलच्या सुरक्षेबाबत कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचे ए्स्पर यांनी गांत्झ यांच्याबरोबर झालेल्या भेटीत स्पष्ट केले. यानंतर मायदेशी परतलेल्या इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेकडून प्रगत शस्त्रास्त्रे खरेदी करणार्या युएईला इस्रायलचा विरोध नसेल, असे जाहीर केले.
इस्रायली संरक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे अमेरिका आणि युएईमधील ‘एफ-३५’ लढाऊ विमानांच्या खरेदीचा अब्जावधी डॉलर्सचा करार मार्गस्थ झाल्याचा दावा केला जातो. येत्या डिसेंबर महिन्यात अमेरिका आणि युएईमध्ये यासंबंधी करार पार पडणार असल्याचे बोलले जाते. पुढच्या आठवड्यात अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षीय निवडणूक असून या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम अमेरिका-युएई करारावर पडू नये म्हणून अमेरिकेकडून ही घाई केली जात असल्याचा दावा केला जातो. यासाठी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लवकरच आखाती देशांचा दौरा देखील करणार आहेत.
येमेनमधील इराणसमर्थक हौथी बंडखोरांविरोधी कारवाईसाठी अमेरिका युएईला सदर विमाने पुरवित असून अमेरिका असाच करार सौदी अरेबिया सोबतही करणार आहे. त्यामुळे इस्रायलच्या एका सहमतीमुळे अमेरिका युएई तसेच सौदीला देखील या विमानांची विक्री करणार असल्याची चर्चा आखातातील माध्यमांमध्ये आहे. मात्र दोन आठवड्यांपूर्वी कतारने केलेल्या ‘एफ-३५’च्या मागणीला अमेरिकेने प्रतिसाद दिलेला नाही. इराण तसेच तुर्कीबरोबरील कतारचे वाढते सहकार्य अमेरिका तसेच इस्रायल, सौदी, युएई या देशांच्या विरोधाला जबाबदार असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर कतारकडून गाझापट्टीतील हमासच्या दहशतवाद्यांना मिळत असलेल्या सहाय्याचा मुद्दाही इस्रायलने याआधी अमेरिकेकडे उपस्थित केला होता. त्यामुळे ‘एफ-३५’च्या करारातून कतारला वगळण्यात येणार असल्याचे दिसत आहे.