रशियन हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये घसरण

लंडन – रशियाने सोमवारी सकाळी युक्रेनवर केलेल्या जबर क्षेपणास्त्र हल्ल्यांचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय शेअरबाजारांमध्ये उमटले. अमेरिकेसह युरोप तसेच आशियातील शेअरबाजारांमध्ये घसरण झाली असून सोने तसेच कच्च्या तेलाचे दरही खाली आले आहेत. गेल्या काही महिन्यात रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक आघाडीचे शेअरनिर्देशांक वर्षातील नीचांकी पातळीवर आले असतानाच नवे हल्ले या नुकसानात अधिकच भर टाकणारे ठरले आहेत.

European-Marketअमेरिकेतील नॅस्डॅक शेअरनिर्देशांक सव्वा टक्क्यांनी घसरला असून डो जोन्स व ‘एस ॲण्ड पी 500’ हे 0.27 व 0.69 टक्क्यांनी खाली आले आहेत. युरोपातील एफटीएसई, डॅक्स, एईएक्स, स्टॉक्स500 या निर्देशांकांमध्येही जवळपास एक टक्क्यांची घसरण दिसून आली. आशियातील जपान, चीन, दक्षिण कोरिया, भारत, मलेशिया, तैवान तसेच हाँगकाँगचे शेअरबाजार अर्ध्या टक्क्यापासून तीन टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत.

शेअरबाजारांबरोबरच चलन व्यवहार तसेच सोने व इंधनाच्या दरांवरही परिणाम दिसून आला. सोन्याचे दर दीड टक्क्यांहून अधिक घसरले असून प्रति औंसामागे 1,671 डॉलर्सवर आले आहेत. तर कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये एक टक्क्यांहून अधिक घसरण नोंदविण्यात आली. चलन बाजारपेठेत अमेरिकी डॉलरचे मूल्य भक्कम झाले असून युरो, पौंड, युआन, येन तसेच ऑस्ट्रेलियन डॉलरचे मूल्य घसरले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय शेअरबाजार तसेच इतर बाजारपेठांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे जगभरात महागाईचा भडका उडून मंदीसदृश स्थितीचे संकेत मिळाले होते. रशियाच्या नव्या हल्ल्याने गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा अस्वस्थता पसरली असून पुढील काही दिवसात त्याचे पडसाद उमटण्याचे दावे विश्लेषक तसेच तज्ज्ञांकडून करण्यात येत आहेत.

leave a reply