देशात पहिल्या ‘सेमिकॉन` परिषदेचे आयोजन

नवी दिल्ली – भारतात सेमीकंडक्टरचा हब म्हणून विकसित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी देशात सेमीकंडक्टरची इकोसिस्टिम तयार करण्यावर भर दिला जात असून या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. याच योजनेअंतर्गत देशात पहिल्यांदाच ‘सेमिकॉन` परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनीसह अनेक प्रगत देशात ‘सेमिकॉन` परिषदा आणि प्रदर्शनांचे दरवर्षी आयोजन होत असते. बंगळुरूमध्ये ही परिषद पार पडणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचे उद्घाटन करतील, असे माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मंगळवारी जाहीर केले.

‘सेमिकॉन`‘सेमीकॉन इंडिया-2022`चा मुख्य उद्देश या क्षेत्रातील जागतिक कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याचा आहे. 29 एप्रिल ते 1 मे अशी तीन दिवस ही परिषद बंगळुरूमध्ये पार पडणार आहे. ‘डिझाईन ॲण्ड मॅन्युफॅक्चरींग इन इंडिया, फॉर द वर्ल्ड: मेकींग इंडिया सेमीकंडक्टर नेशन` अशी या परिषदेची थीम आहे. ही परिषद देशाला सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचा दृष्टिकोनाला अधिक पुढे घेऊन जाईल, असा विश्‍वास चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे.

या परिषदेपूर्वी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे एक रोड-शोही आयोजित केला जाणार आहे. या परिषदेदरम्यान मोठ्या प्रमाणावर जागतिक कंपन्यांचे व स्थानिक कंपन्यांचे प्रतिनिधी, तज्ज्ञ उपस्थित राहतील. यावेळी महत्त्वाचे करार होण्याची शक्यताही राजीव चंद्रशेखर यांनी वर्तविली. ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन`तर्फे (आयएसएम) डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत स्वतंत्र व्यापार विभाग स्थापन करण्यात आला आहे. हा विभाग या क्षेत्रात देशात धोरणात्मक गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन योजना आखून काम करीत असल्याचे यावेळी चंद्रशेखर यांनी अधोरेखित केले.

जगाला गेल्या दीड वर्षापासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्याने ग्रासले आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, चीनमधील वीज टंचाईमुळे तेथील उत्पादनावर झालेला परिणाम आणि आता युक्रेन युद्धामुळे सेमीकंडक्टरसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा रोखला गेल्याने हा तुटवडा कायम आहे. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, संरक्षण व अंतराळ, आरोग्यक्षेत्रातील उपकरणे अशा 70 हून अधिक क्षेत्रात सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा मेंदू म्हणून सेमीकंडक्टरची ओळख आहे. त्यामुळे सेमीकंडक्टर क्षेत्राला फार मोठे धोरणात्मक महत्त्व आहे. त्यामुळे सेमीकंडक्टरची विस्कळीत पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी भारताने सेमीकंडक्टर मिशन हाती घेतले आहे. याचा उद्देश भविष्यात भारताला सेमीकंडक्टरचा हब बनविणे आणि पुरवठासाखळीतील विश्‍वासार्ह देश म्हणून भारताला पुढे आणण्याचा आहे.

याकरिता निरनिराळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. चार महिन्यांपूर्वी सरकारने सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 76 हजार कोटींची तरतूद केली होती. सेमीकंडक्टर आणि त्याच्याशी निगडित उत्पादनांसाठी प्रकल्प स्थापन करणाऱ्या कंपन्यांना याद्वारे आर्थिक सवलत दिली जाणार आहे. याला मोठा प्रतिसाद लाभत आहे. परदेशी कंपन्यानीही भारतात गुंतवणुकीला मोठा प्रतिसाद दिला आहे. गेल्याच आठवड्यात अमेरिकेच्या द सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशन (एसआयए) आणि इंडिया इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड सेमीकंडक्टर असोसिएशनमध्ये (आयईएसए) सामंजस्य करार झाला होता. भारत आणि अमेरिकेतील सेमीकंडक्टर क्षेत्रात कार्यरत कंपन्यांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या कराराद्वारे केला जाणार आहे.

leave a reply