श्रीनगर – बुधवारी जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षादलांनी पाच दहशतवाद्यांना ठार केले. गेल्या चार दिवसात झालेली ही तिसरी चकमक असून यात १४ दहशतवादी ठार झाले आहेत.
शोपियान जिल्हातील सुगु भागात दहशतवादी आणि सुरक्षादलांची बुधवारी चकमक उडाली. यामध्ये पाच दहशतवादी ठार झाले. रविवारपासून शोपियानमध्ये सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये तीन वेळा चकमक उडाली असून १४ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या चकमकीमध्ये हिजबुल मुजाहहिद्दीनला मोठा हादरा बसला आहे, असे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले.
सोमवारी जम्मू काश्मीरच्या शोपियानजिल्ह्यात सुरक्षादलांच्या जवानांनी ‘हिजबुल’च्या चार दहशतवाद्यांना ठार करण्यात होते. तर रविवारी शोपियनमध्येच पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. मागील दोन आठवड्यात सुरक्षादलाने केलेल्या ९ कारवायांमध्ये २२ दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. या दहशतवाद्यांमध्ये सहा टॉप कमांडर्सचा समावेश आहे.
जम्मू काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरु आहेत..दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तान सीमेवर सातत्याने गोळीबार करीत आहे. सुरक्षादलांकडून याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.