इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यात पाच जणांचा बळी

- हमास, हिजबुल्लाहकडून हल्ल्याचे स्वागत

पाच जणांचा बळीजेरूसलेम – इस्रायलच्या बेनी ब्राक शहरात दहशतवाद्याने केलेल्या गोळीबारात पाच जणांचा बळी गेला. इस्रायल सध्या ‘अरब दहशतवादाच्या लाटेचा’ सामना करीत असल्याचा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. गेल्या सात दिवसात इस्रायलमध्ये झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला ठरतो. याआधीच्या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. गाझापट्टीतील हमास आणि लेबेनॉनमधील हिजबुल्लाहने मंगळवारी रात्री झालेल्या या हल्ल्याचे स्वागत केले आहे.

इस्रायलची आर्थिक राजधानी तेल अविवचे उपनगर बेनी ब्राक येथील सुपर मार्केटमध्ये मंगळवारी रात्री रायफलधारी दहशतवाद्याने बेछूट गोळीबार केला. यानंतर रस्त्यावरुन पळ काढणारे नागरिक तसेच बाईकस्वार आणि मोटारीतून प्रवास करणार्‍यांवरही या दहशतवाद्याने गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये एक पोलीस तर चारजणांचा समावेश होता. यापैकी दोघे युक्रेनी होते, अशी माहिती इस्रायली माध्यमे देत आहेत. इस्रायली पोलिसांच्या कारवाईत हा हल्ला चढविणारा दहशतवादी दिया हमरशेह ठार झाला.

दिया हमरशेह पॅलेस्टईनच्या वेस्ट बँकमधील असल्याचे उघड झाले असून याआधीही त्याला एका गुन्ह्याखाली सहा महिन्यांची शिक्षा झाली होती. बेनी ब्राक येथील हल्ल्याप्रकरणी इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी वेस्ट बँकमधून पाच जणांना ताब्यात घेतले. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी लष्कराच्या एक हजार जवानांना वेस्ट बँक तसेच इस्रायलच्या मुख्य शहरांमध्ये तैनात केले आहे. गेल्या आठवड्याभरात इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर ही तैनाती वाढविण्यात आलेली आहे.

याआधी इस्रायलच्या हादेरा आणि बिर शेवा या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले झाले होते. आयएसने या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. इस्रायलवर एकामागोमाग एक सुरू असलेल्या या दहशतवादी हल्ल्यांची भारताने कठोर शब्दात निर्भत्सना केली आहे. तर इजिप्त, जॉर्डन, युएई, बाहरिन, तुर्की तसेच अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स या देशांनी याचा निषेध केा आहे.

दरम्यान, लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या इराणसमर्थक दहशतवादी संघटनेने बेनी ब्राक हल्ल्याचे स्वागत केले. अरब देशांबरोबर संबंध प्रस्थापित करून इस्रायल सुरक्षित होणार नाही, असा इशारा हिजबुल्लाहने दिला. तसेच यापुढेही इस्रायलमध्ये हल्ले होत राहतील, असे हिजबुल्लाहने बजावले आहे.

leave a reply