वॉर्सा – रशिया-युक्रेन युद्धामुळे अन्नधान्याच्या निर्यातीवर परिणाम झाला असून आफ्रिका व आखातातील अनेक देशांमध्ये अन्नटंचाई जाणवू लागली आहे. या अन्नटंचाईची तीव्रता वाढत असून त्यामुळे पुढील काळात युरोपात पुन्हा निर्वासितांचे नवे लोंढे घुसतील, असा इशारा ‘फ्रंटेक्स’ या एजन्सीच्या प्रमुख ऐजा कल्नाजा यांनी दिला. गेल्याच महिन्यात आफ्रिकेतून स्पेनमध्ये घुसणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती समोर आली होती.
रशिया व युक्रेन या देशांचा उल्लेख जगाचे ‘ब्रेडबास्केट’ असा करण्यात येतो. गहू, कडधान्य, मका, सूर्यफूल यांच्या उत्पादनात हे देश आघाडीवर आहेत. जागतिक कडधान्याच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे 14 टक्के निर्यात रशिया व युक्रेनमधून केली जाते. रशिया-युक्रेन युद्धामुळे दोन्ही देशांमधील कृषी उत्पादनांवर मोठे परिणाम झाले आहेत. रशियावरील निर्बंधांमुळे या देशातून होणारी अन्नधान्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहेत.
युक्रेनवर चढविलेल्या हल्ल्यांमुळे या देशातील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचवेळी युक्रेनमधील काही भाग रशियाच्या ताब्यात असल्याने त्यातून होणारी अन्नधान्याची निर्यातही रोखली गेली आहे. रशियाने युक्रेनमधील बंदरांवर ताबा मिळविल्याने त्यातून होणारी जवळपास नऊ कोटी टन अन्नधान्याची निर्यात थांबली असल्याचा दावा युक्रेन सरकारने केला आहे.
आफ्रिका तसेच आखातातील बहुतांश देश रशिया तसेच युक्रेनमधून निर्यात होणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून आहेत. मात्र हा स्रोत बंद झाल्याने अनेक देशांमध्ये भीषण अन्नटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अन्नधान्याच्या किंमतीही प्रचंड प्रमाणात वाढल्या असून उपासमारी व इतर संकटांमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. आफ्रिका व आखाती देशांमधील नागरिकांचे हे लोंढे पुन्हा युरोपिय देशांकडे वळत असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या दशकात सिरियासह आखातातील इतर संघर्षांमुळे लाखो निर्वासितांचे लोंढे युरोपात घुसले होते. यामुळे युरोपला राजकीय, सामाजिक तसेचे आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले होते. सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे 50 लाखांहून अधिक युक्रेनी नागरिकांनी निर्वासित म्हणून युरोपिय देशांमध्ये आश्रय घेतला आहे. युद्ध लांबल्यास ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यात आफ्रिका व आखाती देशांमधील लोंढ्यांची भर पडल्यास युरोपिय देशांसमोरील आव्हाने अधिकच तीव्र होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.