परकीय कंपन्यांना भारतात उपग्रह प्रक्षेपक, ग्राउंड स्टेशन उभारता येईल

- इस्रो प्रमुख के. सिवन

ग्राउंड स्टेशनबंगळूरू – भारतात अंतराळ क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणूक करण्याची, तसेच येथे आपले ग्राउंड स्टेशन उभारण्याची परवानगी मिळू शकते, असे संकेत इस्रो प्रमुख आणि भारताच्या अंतराळ विभागाचे सचिव के. सिवन यांनी दिले आहे. सध्या नवे अंतराळ धोरण तयार केले जात आहे. या संदर्भांत काही महिन्यापूर्वी घोषणा करण्यात आली होती आणि लवकरच भारतीय अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. आता परकीय कंपन्यांही या क्षेत्रात गुंतवणूक करण्याची परवानगी देण्याचा आणि त्यांना येथे सुविधा उभारू देण्याचा प्रस्ताव असून लवकरच हा प्रस्ताव देशाच्या नव्या अंतराळ धोरणाचा भाग होईल, असे के. सिवन यांनी एका मुलाखतीत जाहीर केले.

देशाच्या नव्या अंतराळ धोरणामुळे केवळ खाजगी क्षेत्राच नव्हे परकीय गुंतवणूकदारांनाही या क्षेत्रात गुंतवणुकीचे दार खुले होणार आहे. परकीय कंपन्या भारतात आपली ग्राउंड स्टेशन उभारू शकतील, उपग्रह आणि प्रक्षेपक यान बनविण्यासाठी सुविधा उभारू शकतील. तसेच जोपर्यंत एखादी परकीय कंपनी देशात गुंतवणूक करीत आहेत, तोपर्यंत त्या कंपनीला आपल्या देशाच्या ‘स्पेसपोर्ट्स’चाही वापर करता येईल, असे इस्रो प्रमुख के. सिवन यांनी म्हटले आहे.

ग्राउंड स्टेशनतयार करण्यात येत असलेल्या देशाच्या नव्या अंतराळ धोरणात हा धाडसी निर्णय असेल. या संदर्भांतील काम सुरु असून हा प्रस्ताव लवकरच नव्या धोरणाचा भाग बनेल. यामुळे भारतीय कंपन्यांबरोबर भागीदारी न करताही परकीय कंपन्या देशातील अंतराळ क्षेत्रात गुंतवणूक करू शकतील, अशी माहिती के. सिवन यांनी दिली आहे. तसेच भारतीय कंपन्याही परकीय कंपन्यांबरोबर भागीदारी करू शकतात, असे के. सिवन यांनी स्पष्ट केले.

अंतराळ क्षेत्रातील गुंतवणूक हा संवदेनशील मुद्दा आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन गाईडलाईन आखल्या जातील. याचे पालन करणे परकीय कंपन्यांसाठी बंधनकारक असेल. धोरण तयार झाल्यावर प्रत्येक गुंतवणुकीचे प्रस्ताव वेगवेगळे हाताळले जातील, असे के. सिवन म्हणाले. खाजगी क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्रासाठी खुले करण्याची घोषणा केल्यावर कित्येक प्रस्ताव आले आहेत. परदेशी कंपन्यांनीही रस दाखवल्याचे के. सिवन यांनी सांगितले.

leave a reply