पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांकडून भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा

लाहोर – ‘पाकिस्तानच्याच बरोबरीने स्वतंत्र झालेला भारत आपल्या जनतेच्या आवश्यकतेनुसार स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखून अधिकाधिक स्वावलंबी बनत चालला आहे. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना हे साधता आलेले नाही. उलट ते भिकाऱ्यांना निवडीचा अधिकार नसतो, असे सुनावत आहेत’, असे सांगून विरोधी पक्षनेते इम्रानखान यांनी पाकिस्तानच्या सरकारवर तोफ डागली. त्याचवेळी भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची इम्रानखान यांनी प्रशंसा केली.

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांकडून भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसालाहोरमध्ये आयोजित केलेल्या सभेत बोलताना माजी पंतप्रधान इम्रानखान यांनी पाकिस्तानच्या सरकारवर सडकून टीका केली. भारताने इतर देशांबरोबर धोरणात्मक भागीदारी विकसित केली आहे. भारत अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार देश आहे. तरीही भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणारे इंधन खरेदी केले. अमेरिकेने याला विरोध केला, तरी भारताने याची पर्वा केली नाही. पण पाकिस्तान हा काही अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार देश नाही. तरीही पाकिस्तानचे सरकार रशियाकडून इंधन खरेदी करण्याची धमक दाखवू शकले नाही, अशी जळजळीत टीका इम्रानखान यांनी केली.

या सभेत इम्रानखान यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा व्हिडिओ दाखविला. भारत रशियाकडून इंधनाची खरेदी करून युक्रेनचे युद्ध का प्रायोजित करीत आहे, असा प्रश्न एका पाश्चिमात्य पत्रकाराने जयशंकर यांना विचारला होता. त्याला जयशंकर यांनी दिलेले सडेतोड उत्तर या व्हिडिओमध्ये होते. भारतापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात युरोपिय देश रशियाकडून इंधनाची खरेदी करीत आहेत, ही बाब जयशंकर यांनी लक्षात आणून दिली होती. त्याचा दाखला देऊन इम्रानखान यांनी पाकिस्तानचे नेते अशी धमक दाखवू शकतील का? असा प्रश्न या सभेत केला.

मी रशियाकडून सवलतीच्या दरात इंधनाची खरेदी करण्याच्या तयारीत होतो. पण नंतर सत्तेवर आलेले सरकार ही हिंमत दाखवू शकले नाही. उलट भिकाऱ्यांना निवडीचे स्वातंत्र्य असू शकत नाही, असे ही मंडळी पाकिस्तानच्या जनतेला सुनावत असल्याची टीका इम्रानखान यांनी केली. दरम्यान, इम्रानखान यांनी याआधीही भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा केली होती. आपल्या जनतेच्या हितासाठी भारत कुणाचीही पर्वा करीत नाही, असे इम्रान खान म्हणाले होते. मात्र रशियाकडून पाकिस्तानसाठी सवलतीच्या दरात आपण इंधन खरेदी करणार होतो, हा इम्रानखान यांनी केलेला दावा पोकळ असल्याचा आरोप पाकिस्तानातूनच होत आहे. रशियन इंधनाच्या शुद्धीकरणाचे प्रकल्पच पाकिस्तानात नाहीत. त्यामुळे पाकिस्तान रशियाकडून इंधनाची खरेदीच करू शकत नाही, असे पाकिस्तानचे विश्लेषक सांगत आहेत.त तरीही वारंवार इम्रानखान या मुद्दा उपस्थित करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा ठपका विश्लेषक ठेवत आहेत.

leave a reply