हनोई – कोरोनाव्हायरसचा फैलाव आणि ‘साऊथ चायना सी’मधील तणाव या मुद्द्यांवरून व्हिएतनामने असियानच्या बैठकीत चीनवर सडकून टीका केली. गेल्या कित्येक वर्षांपासून उभी केलेली अर्थव्यवस्था कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे ढासळल्याची टीका व्हिएतनामचे पंतप्रधान ‘न्यूएन शुआन फुक’ यांनी केली. त्याचबरोबर ‘साऊथ चायना सी’मधील परिस्थिती चिघळू नये, यासाठी चीनने या क्षेत्रातील आपल्या लष्करी हालचाली रोखाव्यात, असे व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी फटकारले. व्हिएतनामप्रमाणे फिलिपाईन्स, मलेशिया आणि ब्रूनेई या देशांनी देखील या बैठकीत ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्च्या हालचालींना विरोध केला आहे.
‘कोहेसिव्ह अँड रिस्पोंसिव्ह असियान’ या शीर्षकाखाली आयोजित केलेली आग्नेय आशियाई देशांची ३६वी बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या व्हिएतनामने यावेळी उघड उल्लेख न करता चीनवर जोरदार टीका केली. ‘एका देशातून फैलावलेल्या कोरोनाव्हायरसच्या महामारीमुळे आग्नेय आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे’, अशा शब्दात व्हिएतनामचे पंतप्रधान फुक यांनी चीनवर निशाणा साधला. या साथीच्या पार्श्वभूमीवर, जपानकडून आग्नेय आशियाई देशांना वैद्यकीय सहाय्य केले जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. तर ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रावर अधिकार सांगणाऱ्या चीनच्या विरोधात व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया आणि ब्रुनेई या चारही देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले.
सारे जग कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यामध्ये गुंतलेले असताना काही देश आपल्या बेजबाबदार कारवायांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून या क्षेत्रात तणाव निर्माण करीत असल्याची जहरी टीका पंतप्रधान फुक यांनी यावेळी केली. ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील परिस्थिती चिघळून या ठिकाणी तणाव निर्माण होऊ नये यासाठी सदर क्षेत्रावर हक्क सांगणार्या देशांनी येथील लष्करी हालचाली पूर्णपणे बंद कराव्यात, असे आवाहन चारही आग्नेय आशियाई देशांनी यावेळी केले. ‘साऊथ चायना सी’चा मुद्दा सामोपचाराने सोडवण्याचे ठरलेले असताना देखील चीनकडून या सागरी क्षेत्रात सुरू असलेल्या लष्करी हालचालींवर यावेळी आग्नेय आशियाई देशांनी सडकून टीका केली. गेल्या काही महिन्यांमध्ये चीनने या सागरी क्षेत्रात व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सच्या जहाजांवर केलेल्या कारवाईवरही या बैठकीत टीका करण्यात आली.
कोरोनाव्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन चीन ‘साऊथ चायना सी’ वरील आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करील, असा इशारा सदर बैठकीत यावेळी देण्यात आला. याआधी ९०च्या दशकात आशियाई देशांमध्ये आलेल्या आर्थिक संकटाच्या काळात आणि तसेच सार्सची महामारी आली त्यावेळी देखील चीनने ‘साऊथ चायना सी’ वरील आपला दावा भक्कम करण्यासाठी लष्करी हालचाली केल्याची आठवण सदर बैठकीत करून देण्यात आली. त्यामुळे कोरोनाव्हायरसच्या महामारीच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीचा चीन नक्कीच फायदा घेईल, अशी चिंता या चारही देशांनी व्यक्त केली आहे.
काही आठवड्यांपूर्वी व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सने ‘साऊथ चायना सी’वरील चीनच्या दावेदारीला आव्हान दिले होते. चीनच्या या दावेदारीविरोधात अमेरिकेने आपल्याला सहाय्य करावे, असे आवाहन व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सने केले होते. त्यानंतर अमेरिकेने या सागरी क्षेत्रात आपल्या विमानवाहू युद्धनौका रवाना करून चीनला इशारा दिला होता. फिलिपाईन्सने देखील अमेरिकेबरोबरच्या लष्करी सहकार्य कराराची मुदत वाढवून आपल्या देशातील लष्करी तळ अमेरिकी युद्धनौकांसाठी खुला केला होता. फिलिपाइन्सच्या या भूमिकेवर चीनने आक्षेप घेऊन फिलिपाईन्सला गंभीर परिणामांचा इशाराही दिला होता. पण आग्नेय आशियाई देश चीनच्या या धमक्यांना भीक घालत नसल्याचे गेल्या काही दिवसांपासून प्रकर्षाने दिसू लागले आहे. असियानच्या बैठकीतील व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया आणि ब्रुनेईने चीनवर केलेली टीका हेच दाखवून देत आहे.