पाकिस्तानच्या बलोचिस्तानमधील स्फोटात चार ठार

स्फोटात चार ठारइस्लामाबाद – पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतातील डेरा बुग्ती जिल्ह्यात झालेल्या भूसुरूंग स्फोटात चार जण ठार झाले. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा एक जवान तसेच पाकिस्तान संलग्न दहशतवादी संघटनेचे तीन जण मारले गेले. गेल्या पाच दिवसात बलोचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेवर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात वाढलेल्या या हल्ल्यांबाबत पाकिस्तानच्या यंत्रणा परस्परविरोधी दावे करीत आहेत.

शुक्रवारी दुपारी बलोचिस्तानची राजधानी क्वेट्टापासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या डेरा बुग्ती जिल्ह्यातील ‘सुई’ भागात हा हल्ला झाला. पाकिस्तानी लष्कराची मोटार या भागातून प्रवास करीत असताना भूसुरूंगावरुन गेल्यामुळे स्फोट झाला. या स्फोटात ठार झालेल्या चार जणांपैकी तीन जण पाकिस्तानच्या यंत्रणेशी संलग्न दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. तर हे तिघेही ‘लश्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याचा दावा केला जातो.

स्फोटात चार ठारस्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करणार्‍या ‘बलोच रिपब्लिकन आर्मी-बीआरए’ने हा स्फोट घडविल्याचा आरोप केला जातो. चार दिवसांपूर्वी बलोचिस्तानच्याच केच भागात दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराची सुरक्षा चौकी उद्ध्वस्त केली होती. यामध्ये १० जवानांचा बळी गेला होता. यासाठी देखील अफगाणिस्तानातून पाकिस्तानात दाखल झालेल्या बलोच बंडखोर संघटना जबाबदार असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता.

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी पाकिस्तानविरोधी दहशतवादासाठी अफगाणिस्तानचा वापर होत असल्याचे म्हटले होते. तसेच अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीबाबत पाकिस्तान आशावादी नसल्याचे लक्षवेधी विधान युसूफ यांनी केले होते.

स्फोटात चार ठारत्यामुळे पाच महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्याच पाठिंब्यावर अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित करणारी तालिबान आपल्या देशाविरोधात गेल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या काही अधिकार्‍यांनी इराणच्या सीमेतून घुसखोरी केलेल्या बलोच बंडखोरांनी हे हल्ले चढविल्याचे म्हटले होते. यामुळे पाकिस्तानी यंत्रणा आपल्या देशातील दहशतवादी हल्ल्यांबाबत लपवाछपवी करीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यामुळे गोंधळलेल्या काही पत्रकारांनी गेल्या आठवड्यात लाहोरमध्ये झालेल्या स्फोटांमागे भारताची गुप्तचर यंत्रणा असल्याचा आरडाओरडा सुरू केला होता.

पण पाकिस्तानातील काही जबाबदार पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित केले आहेत. अफगाणिस्तान किंवा इराणच्या सीमाभागातून घुसखोरी करून दहशतवादी हल्ले चढवित असतील, तर पाकिस्तानचे लष्कर व गुप्तचर यंत्रणा झोप काढत आहेत का? हा मुलभूत प्रश्‍न या पत्रकारांनी केला आहे.

leave a reply