दमास्कस – शनिवारी सकाळी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या हमा प्रांतात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये चार सिरियन जवानांचा बळी गेला. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यांमध्ये सिरियन लष्कराचे जबर नुकसान झाल्याचा आरोप सिरियातील सरकारशी संलग्न असलेल्या वृत्तसंस्थेने केला. तर हमा प्रांताबरोबरच सिरियाच्या लताकिया आणि होम्स या प्रांतात देखील मोठे स्फोट झाल्याचा दावा ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने केला.
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सकाळी साडेसहाच्या सुमारास भूमध्य समुद्राच्या हद्दीतून सिरियन ठिकाणांवर हल्ले चढविले. हमा प्रांतातील बनियास शहरातील सिरियन लष्कराच्या सुरक्षा चौक्यांना लक्ष्य करून इस्रायलने हे हल्ले केल्याचा आरोप सिरियन वृत्तसंस्थेने लष्करी सूत्राच्या हवाल्याने केला. गेल्या रविवारी १३ नोव्हेंबर रोजी इस्रायलच्या विमानांनी होम्स शहराच्या दक्षिणेकडील शायरत विमानतळाला लक्ष्य केल्याचा ठपका सिरियन सरकारने ठेवला होता. यामध्ये दोघांचा बळी गेला होता. येथील इराणच्या शस्त्रास्त्र गोदामाला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता.
आत्तापर्यंत सिरियाने केलेल्या हवाई हल्ल्यांच्या आरोपांवर इस्रायलने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पण सिरियामध्ये इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटना शस्त्रास्त्रांची तस्करी करीत असतील, त्यांच्यावर हल्ले चढविले जातील, असा इशारा इस्रायलने याआधीच दिलेला आहे.