जगात कोरोनाची चौथी लाट आली आहे, सावध व्हा!

- नियम न पाळणार्‍यांना केंद्र सरकारचा इशारा

चौथी लाटनवी दिल्ली – जगातील १०८ देशांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग पसरला आहे. तसेच कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंटही गेलेला नाही. यामुळे जगात कोरानोची चौथी लाट आली आहे. मास्क न वापरणार्‍या, तसेच सोशल डिस्टन्सिंग न राखणार्‍या जनतेला या शब्दात केंद्र सरकारने सावध केले आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना नाईट कर्फ्यू लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुन्हा एकदा दिली.

भारतात कोरोनाचा पॉझिटिव्ह दर गेल्या ४० दिवसांपासून एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ९८.४० टक्के आहे. याशिवाय ओमिक्रॉनच्या बाबतीतही जागतिक सरासरीपेक्षा भारताचा पॉझिटिव्ह दर कमी आहे. गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाचे सहा हजार ६५० नवे रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती इतर जगाच्या तुलनेत खूप चांगली आहे. आशियाई देशात कोरोनाचा पॉझिटिव्ह दर घटला आहे. असे असले, तरी जगात कोरोनाची चौथी लाट आल्याचे दुर्लक्षित करून चालणार नाही, याकडे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लक्ष वेधले आहे. अनावश्यक फिरणे, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन न यासारखा हलगर्जीपणा महागात पडू शकतो. खरेदीसाठी बाजारात उसळलेली गर्दी चिंता वाढविणारी असल्याचे भूषण यांनी अधोरेखित केले आहे.

देशात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटचे आतापर्यंत ३५८ रुग्ण आढळले आहे. गेल्या चोवीस तासातच १२२ रुग्णांना ओमिक्रॉन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील १८३ रुग्णांच्या अहवालाचे विश्‍लेषण करण्यात आले. यामध्ये ८७ जणांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे. तर तिघांनी बुस्टर डोस घेतला आहे. १२१ जणांची परदेश प्रवासाची नोंद आहे, अशी माहितीही यावेळी भूषण यांनी दिली. तसेच ४४ जण परदेशातून आलेल्या प्रवाशांच्या संपर्कात आल्याने ओमिक्रॉन संसर्गित झाले आहे, ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

भारतात डेल्टा व्हेरिअंट अजून गेलेला नाही. काही भागात रुग्ण वाढत आहेत. केरळ आणि मिझोरामध्ये रुग्ण वाढले आहेत. देशातील २० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचा दर ५ ते १० टक्के आहे. यातील १० जिल्हे केरळातील, तर दोन जिल्हे मिझोराममधील आहेत. काही भागात डेल्टाचे रुग्ण अजूनही मोठ्या प्रमाणावर आढळत असून अशा स्थितीत अधिक वेगाने पसरणार्‍या ओमिक्रॉनचे संकट आहे, असे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.

डेल्टा, अल्फा, बिटा या कोरोनाच्या व्हेरिअंटवर भारतात वापरण्यात आलेली उपचारपद्धती ओमिक्रॉन व्हेरिअंटवरही प्रभावी ठरत आहे. ही बाबही त्यांना अधोरेखित केली. पण त्याचवेळी डॉ. भार्गव यांनीही सावधानतेचा इशारा दिला. परदेशासारखी परिस्थिती भारतात येऊ नये यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन आणि जास्तीत जास्त जणांचे लसीकरण याच रणनीतीवर काम करण्याची गरज आहे, असे डॉ. भार्गव म्हणाले.

केंद्र सरकारकडून इशारा देण्यात येत असताना आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी गणिती मॉड्यूलद्वारे लावलेल्या अंदाजात भारतात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये ही लाट उच्चांकावर गाठेल, असा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, युरोप व अमेरिकेमध्ये आलेल्या कोरोनाच्या नव्या लाटेसाठी ‘डेलमिक्रॉन’ जबाबदार असल्याच्या बातम्या येत आहे. डेल्टा आणि ओमिक्रॉन हा शब्द एकत्रित करून ‘डेलमिक्रॉन’ हा शब्द तयार करण्यात आला असून या दोन व्हेरिअंटच्या एकत्रित प्रभावाने कोरोनाची नवी लाट आल्याचे दावे केले जात आहेत.

leave a reply