पॅरिस – अमेरिकेतील वित्तसंस्थांकडून गेल्या काही दिवसात इंधनाच्या दरांचा भडका उडण्याबाबत भाकिते व अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. इंधनाच्या दरांबाबत करण्यात येणारी ही वक्तव्ये दिशाभूल करणारी असल्याचा दावा ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’ने (आयईए) केला. गेल्या पाच महिन्यात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये ८० टक्क्यांची वाढ झाली असून नजिकच्या काळात हे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत उसळू शकतात, असे भाकित अमेरिकन वित्तसंस्था व विश्लेषकांनी केले होते.
चीनमधून सुरू झालेल्या कोरोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक अर्थव्यवस्थेची गती मंदावली होती. अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ची घोषणा करावी लागल्याने प्रमुख उद्योगांसह दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले होते. याचा मोठा फटका इंधनक्षेत्राला बसला होता. मार्च २०२०मध्ये कच्च्या तेलाचे दर २३ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत खाली आले होते. आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी हे दर १० डॉलर्सपर्यंत कोसळू शकतात, असा इशाराही दिला होता.
मात्र काही महिन्यांपूर्वी अनेक देशांनी लॉकडाऊन उठवून दैनंदिन व्यवहार व उद्योगक्षेत्राला गती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होण्यास सुरुवात झाली होती. दर वाढावेत म्हणून उत्पादनात कपात करण्याचा प्रस्ताव सौदी अरेबिया व ‘ओपेक’च्या काही सदस्यांनी मांडला होता. कपातीला मान्यता मिळाली नसली तरी गेल्या वर्षी लागू केलेली कपात कायम ठेवण्याचे संकेत ओपेक व सहकारी देशांनी दिले आहेत.
कच्च्या तेलाची मागणी वाढत असतानाही कपात कायम राहिल्याने दरांमध्ये हळुहळू वाढ होण्यास सुरुवात झाली होती. सध्या इंधनाचे दर ६७ डॉलर्स प्रति बॅरल असून येत्या काही आठवड्यात ते ७५ डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरांमध्ये होणार्या या वाढीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील वित्तसंस्थांनी कच्च्या तेलासंदर्भात भाकिते करणारे अहवाल प्रसिद्ध केले होते. त्यात पुढील वर्षापर्यंत कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्सपर्यंत उसळी घेतील, असे सांगण्यात आले होते.
या अहवालांवर ‘आयएई’ने आक्षेप घेतला असून त्यातील अंदाज व माहिती दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे. जगातील विविध देशांकडून जाहीर करण्यात येणार्या अर्थसहाय्यामुळे मागणी वाढेल व पुरवठा कमी असल्याने कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढीचे सत्र सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र विविध देशांमध्ये कच्च्या तेलाचे राखीव साठे मोठ्या प्रमाणात असून मागणीच्या तुलनेत तुटवडा होण्याची शक्यता नाही, असे ‘आयईए’ने बजावले आहे.