न्यूयॉर्क – इराणबरोबरच्या अणुकराराला सर्वाधिक महत्त्व देऊन सौदी अरेबियाच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठे फेरबदल केले होते. त्याचवेळी सौदी अरेबियाच्या सुरक्षेला आव्हान देणार्या येमेनमधील बंडखोरांना उत्तेजन देणार्या बायडेन प्रशासनाने सौदीला लक्ष्य करणारे निर्णय घेतले होते. यामध्ये सौदीला केल्या जाणार्या शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यात कपात करण्याच्या निर्णयाचाही समावेश होता. पण हे धोरण राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर उलटले आहे. युक्रेनमधील युद्धानंतर निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना सौदीबाबतचे धोरण बदलावे लागत आहे, असा टोला अमेरिकेच्या आघाडीच्या दैनिकाने लगावला आहे.
इंधन उत्पादक देशांचे नेतृत्व करणार्या सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर नियंत्रित करण्यासाठी इंधनाचे उत्पादन वाढवावे, अशी मागणी बायडेन प्रशासनाने केली होती. पण गेल्या वर्षभरात बायडेन प्रशासनाने स्वीकारलेल्या भूमिकांमुळे नाराज झालेले सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान जुळवून घेण्यासाठी तयार नाहीत. अमेरिकन दैनिकाने या दाव्याला दुजोरा दिला. यासाठी सौदीने इंधनाच्या दरांबाबत सोमवारी केलेल्या घोषणेकडे सदर दैनिकाने लक्ष वेधले.
‘येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांचे सौदीच्या इंधनप्रकल्पांवर हल्ले सुरू आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या तुटवड्यासाठी सौदीला जबाबदार धरता येणार नाही’, असे सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने फटकारले आहे. त्याचबरोबर इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवायचा असेल तर आंतरराष्ट्रीय समुदायाने हौथींवरील कारवाईबाबत विचार करावा, अशी मागणी सौदीने केली होती. त्यामुळे बायडेन प्रशासन आपल्या धोरणात बदल करीत असली तरी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान त्यासाठी तयार नसल्याचे अमेरिकन दैनिक लक्षात आणून देत आहे.
क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी गेल्या महिन्यात अमेरिकन साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीचा दाखला या दैनिकाने दिला. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आपल्याबाबत काय विचार करतात, याची मी पर्वा करीत नाही’, अशा परखड शब्दात क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी बायडेन प्रशासनाला खडसावले होते. तसेच सौदीने अमेरिकेत ८०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे, येत्या काळात सौदी ही गुंतवणूक मागे घेऊ शकतो, असा इशारा क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी दिला होता. याकडे अमेरिकन दैनिकाने लक्ष वेधले.
सौदी अरेबियाचे राजे सलमान असले तरी सौदीची सर्व सूत्रे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या हातात आहे. तेच सौदीचे पुढचे राजे म्हणून ओळखले जातात. असे असतानाही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना फोन करण्याचे टाळले. म्हणूनच आता रशिया-युक्रेन संघर्षाप्रकरणी बायडेन चर्चा करण्यासाठी उत्सुक असताना देखील प्रिन्स मोहम्मद बायडेन यांच्याशी फोनवर बोलण्याचे टाळत आहेत, असा दावा या दैनिकाने केला होता.
अशा परिस्थितीत, काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची समजूत काढत आहेत. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांच्याकडे दुर्लक्ष करून अमेरिकेला परराष्ट्र धोरण आखता येणार नाही. रशिया-युक्रेन संघर्षामुळे इंधनाची टंचाई जाणवत असताना अमेरिकेला सौदीची आवश्यकता असल्याचे हे अधिकारी बायडेन यांना पटवून देत असल्याचे या दैनिकाने म्हटले आहे.