नवी दिल्ली – कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 भारतीय सैनिकांना शहीद करणारा गलवान व्हॅलीमधील चीनच्या लष्कराचा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग होता. अमेरिकन संसदेच्या एका समितीने आपल्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. चीनच्या सीमेलगत भारत उभारीत असलेल्या पायाभूत सुविधांमुळे अस्वस्थ झालेल्या चीनने हा हल्ला घडवून आणल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. या हल्ल्याच्या काही दिवस आधी चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी तसेच सरकारी मुखपत्राने केलेल्या विधानांचा दाखलाही या अहवालाने दिला आहे.
गलवान व्हॅलीमध्ये चिनी जवानांनी भारतीय सैनिकांवर हल्ला चढविला व यावेळी झालेल्या संघर्षात 20 भारतीय सैनिक शहीद झाले. हल्ला चढविणाऱ्या चीनच्या लष्कराचे जवान यात भारतापेक्षाही अधिक संख्येने मारले गेले होते. पण चीनने त्याची संख्या उघड केली नाही. हा स्थानिक पातळीवर झडलेला संघर्ष नव्हता, तर त्याचे आदेश चीनच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडूनच आल्याचे दावे करणाऱ्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. पण आता अमेरिकन संसदेच्या अहवालात ही बाब अधिक ठळकपणे मांडण्यात आली आहे.
चीनचे संरक्षणमंत्री वुई फेंगे यांनी आपला देश स्थैर्यासाठी लढाई करण्यास सज्ज असल्याची सूचक विधाने गलवानमधील हल्ल्याच्या आधी केली होती. त्यानंतर काही दिवसातच चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने लडाखमधील सीमावादाचे भारताला भयंकर परिणाम सहन करावे लागतील, अशी धमकी दिली होती. त्यानंतर गलवानमध्ये चीनच्या लष्कराने हल्ला चढविला, याकडे सदर अहवालात लक्ष वेधण्यात आले. या हल्ल्यामागे चीनचा नक्की कोणता हेतू होता, ते सांगणे अवघड आहे. पण चीनबरोबरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने सुरू केलेली पायाभूत सुविधांची बांधकामे चीनला अस्वस्थ करीत होती. ते रोखण्यासाठी चीनने ही कारवाई केली असावी, अशी शक्यता सदर अहवालात वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, गलवान व्हॅलीतील या संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध विकोपाला गेले होते. यानंतरच्या काळातही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पायाभूत सुविधांसाठी सुरू असलेली बांधकामे भारताने सुरू ठेवली होती. चीन विरोध करीत असतानाही भारताने या क्षेत्रात रस्ते व पूल उभारले आहेत. त्यामुळे गलवानचा हल्ला घडवून भारताला रोखण्याचे चीनचे प्रयत्न व्यर्थ ठरले. त्याचवेळी लडाखच्या नियंत्रण रेषेवर जबरदस्त लष्करी तैनाती करून भारताने चीनला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.
सध्या लडाखच्या हिवाळ्यात चीनचे लष्कर गारठले असून इथल्या हवामानाची सवय नसलेले चीनचे जवान वारंवार आजारी पडत असल्याची बाब समोर येत आहे. चीनच्या जवानांचे मनोधैर्य खचले असून त्यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देताना चीनच्या लष्कराची तारांबळ उडत असल्याच्याही बातम्या येत आहेत.