गँगस्टर विकास दुबे पोलिसांबरोबरील चकमकीत ठार झाला

कानपूर – आठ पोलिसांची हत्या करणारा उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कुख्यात गँगस्टर विकास दुबेला चकमकीत ठार करण्यात आले. गुरुवारी विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे अटक करण्यात आली होती. उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक त्याला कानपूरला घेऊन येत असताना एका अपघातानंतर दुबेने पोलिसांचे शस्त्र हुसकावून पाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला.

Gangster-Vikas-Dubey३ जुलै रोजी पोलीस पथकावर हल्ला करून फरार झालेल्या दुबेचा शोध तीन राज्यांचे पोलीस घेत होते. गुरुवारी अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर त्याला उज्जैन पकडण्यात आले होते. उत्तर प्रदेशच्या पोलिसांचे एक पथक दुबेला कानपुरला आणण्यासाठी मध्य प्रदेशला गेले होते. दुबे ताब्यात घेऊन हे पथक कानपूरला परतत असताना कानपूरपासून काही अंतरावर पोलिसांच्या पथकातील एक वाहन उलटले. विकास दुबे या वाहनात होता.

या दुर्घटनेत दुबे देखील जखमी झाला होता. त्याने जखमी झालेल्या एका पोलिसाचे शस्त्र हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विकास दुबेला घेरले व आत्मसमर्पण करण्यास सांगितले. परंतु त्याने पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिसांनी स्वसंरक्षार्थ केलेल्या केलेल्या गोळीबारात दुबे जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे कानपुर पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर गुरे आल्याने पोलिसांचे वाहन पलटी झाल्याचे सांगण्यात येते. विकास दुबेने केलेल्या गोळीबारात तीन पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांची निर्घृण हत्या करणाऱ्या दुबे विरोधात देशभरात तीव्र् संताप होता. विकास दुबे उत्तर प्रदेशमधील कुख्यात गँगस्टर होता. गेल्या ३० वर्षांपासून त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरु होत्या त्याच्या नावावर तब्बल ६० गुन्हे होते.

leave a reply