जर्मनी, ऑस्ट्रिया व हंगेरी रशियाबरोबरील व्यापारी संबंध तोडणार नाहीत

- पोलंडच्या पंतप्रधानांचा आरोप

व्यापारी संबंधवॉर्सा/मॉस्कोे – रशियावरील निर्बंधांवरून युरोपिय देशांमधील मतभेद दिवसेंदिवस अधिकच तीव्र होऊ लागले आहेत. गुरुवारी महासंघाच्या बैठकीत रशियाच्या इंधनक्षेत्रावरील निर्बंधांवरून युरोपिय देशांमध्ये दोन तट पडल्याचे उघड झाले होते. निर्बंधांचे समर्थन करणार्‍या देशांनी इतर देशांवर ते रशियाच्या कलाने घेत असल्याचे उघड आरोप करण्यास सुरुवात केली आहे. जर्मनी, ऑस्ट्रिया व हंगेरी हे देश रशियाबरोबरील व्यापारी संबंध कधीच तोडणार नाहीत, असा ठपका पोलंडचे पंतप्रधान मॅत्युस्झ मोराविकी यांनी केला.

‘रशियाच्या इंधनक्षेत्रावर निर्बंध लादण्याच्या प्रस्तावाचे पोलंड ठामपणे समर्थन करतो. पण दुर्दैवाने युरोपातील काही मोठ्या तसेच छोट्या देशांनी त्याचे समर्थन केलेले नाही. जर्मनीसह ऑस्ट्रिया व हंगेरी हे देश याबाबतीत ताठर भूमिका घेत आहेत. रशियाबरोबर व्यापारी संबंध तोडण्यास हे देश विरोध करीत आहेत’, असा आरोप पोलंडच्या पंतप्रधानांनी केला. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियावर निर्बंध लादण्यात हे देश अडथळा बनल्याचा दावाही पंतप्रधान मॅत्युस्झ मोराविकी यांनी केला आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर पोलंडच्या रशियासंदर्भातील भूमिकेत कोणताही बदल झाला नसल्याचेही त्यांनी बजावले. रशियावर कठोर निर्बंध लादावेत अशी मागणी करणार्‍या देशांचे म्हणणे योग्यच असल्याचेही पोलंडच्या पंतप्रधानांनी सांगितले. रशियावर लवकरच नवे व कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात, असे संकेतही पंतप्रधान मोराविकी यांनी यावेळी दिले. दरम्यान, रशियाने इंधनवायूचे व्यवहार रुबलमध्ये करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला महासंघाने तीव्र विरोध केला आहे. महासंघाच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डेर लेयन यांनी, महासंघ अशा एकतर्फी निर्णयांना विरोध करतो अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.

व्यापारी संबंधयुरोपिय महासंघाकडून रशियन इंधनासंदर्भात चालू असणार्‍या हालचालींवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘इंधनाच्या मुद्यावर जे युरोपिय देश रशियाशी सहकार्य नाकारत आहेत, त्यांनी त्यांचा नागरिकांना योग्य रितीने जाणीव करून द्यावी. युरोपियन जनतेची संपत्ती कोण व कशा रितीने उद्ध्वस्त करीत आहे, हे दखील त्यांनी उघड करावे. ज्या देशांना त्यांच्या ऊर्जा सुरक्षेची चिंता आहे, अशा देशांबरोबर काम करण्यास रशिया तयार आहे’, असा टोला रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिआ झाखारोव्हा यांनी लगावला.

युरोपिय महासंघाने आतापर्यंत चार टप्प्यात रशियावर मोठे निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांअंतर्गत रशियातील ८७०हून अधिक नेते, अधिकारी व उद्योजकांसह ६२ रशियन कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र रशियाच्या इंधनक्षेत्रावरील निर्बंधांबाबत अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. युरोपिय महासंघातील काही देश एका दिवसात रशियाकडून इंधनाची खरेदी थांबवू शकत नाहीत, अशा शब्दात जर्मनीच्या परराष्ट्रमंत्री ऍनालेना बेअरबॉक यांनी जर्मनीची भूमिका स्पष्ट केली होती. तर हंगेरीच्या इंधनसुरक्षेला धोका निर्माण होईल, अशा कोणत्याही निर्बंधांना आम्ही मान्यता देणार नसल्याचे हंगेरीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बजावले आहे.

leave a reply