चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जर्मनी नवे व्यापारी धोरण आणणार

- व्यापारमंत्री रॉबर्ट हॅबेक

अवलंबित्व कमी करण्यासाठीबर्लिन – चीनवरील वाढते अवलंबित्व कमी करण्यासाठी जर्मनी चीनबरोबर असलेल्या व्यापारी धोरणात बदल करून नवे धोरण राबवेल, अशी घोषणा जर्मनीचे व्यापारमंत्री रॉबर्ट हॅबेक यांनी दिली. पुढील काळात चीनबरोबर व्यापारी करार तसेच व्यवहार करताना कोणत्याही प्रकारचा भाबडेपणा बाळगण्यात येणार नाही, असा दावाही हॅबेक यांनी केला. गेल्या दोन वर्षात हाँगकाँग, तैवान, झिंजिआंग व कोरोना साथीच्या मुद्यावरून जर्मनी व चीनमधील जवळीक कमी होत असल्याचे समोर येत होते. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा तणाव अधिकच वाढला असून धोरणात बदल करण्याचे संकेत त्याला दुजोरा देणारे ठरतात.

जर्मनी हा चीनचा युरोपातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून जर्मनीच्या व्यापारातही चीनचा आघाडीचा वाटा आहे. जर्मनीची आठ टक्के निर्यात व १२ टक्के आयात चीनवर अवलंबून आहे. त्याचवेळी जर्मनीच्या आघाडीच्या कंपन्यांच्या उत्पादनांची १० टक्क्यांहून अधिक बाजारपेठ चीनमध्ये आहे. मात्र गेल्या काही महिन्यात जर्मनीसह युरोपातील इतर देशांमधून चीनमध्ये मिळणारी वागणूक व नियमांबाबत नाराजीचे सूर उमटण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे युरोपिय देशांनी चीनच्या गुंतवणुकीबाबत सावधगिरीची भूमिका घेण्यास सुरुवात केली. याबाबत चीनकडून धमक्यांचे सूर उमटल्यानंतरही युरोपिय देशांनी त्यात बदल करण्याचे नाकारले होते.

अवलंबित्व कमी करण्यासाठीजर्मनीच्या व्यापारमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यातून जर्मनीसह युरोपिय देश चीनसंदर्भातील धोरण बदलण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ‘व्यापारी भागीदार म्हणून चीनचे नक्कीच स्वागत आहे. पण व्यापारी स्पर्धेला हानी पोहोचविणारी चीनची संरक्षणवादी धोरणे जर्मनी खपवून घेणार नाही. व्यापारावर परिणाम होईल म्हणून चीनमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे दुर्लक्षही केले जाणार नाही. यापुढे जर्मनीला व्यापाराच्या मुद्यावर ब्लॅकमेल करता येणार नाही’, अशा आक्रमक शब्दात हॅबेक यांनी चीनला बजावले.

पुढील काळात चीनकडून जर्मनीसह युरोपात होणाऱ्या गुंतवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येईल, असेही हॅबेक पुढे म्हणाले. आपण चिनी कंपनी ‘कॉस्को’च्या हॅम्बर्ग बंदरातील गुंतवणुकीला विरोध केल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चीनला देण्यात येणारी निर्यातविषयक हमी रद्द करण्याचे संकेतही व्यापारमंत्री हॅबेक यांनी दिले आहेत. येणाऱ्या काळात जर्मनी नव्या व्यापारी भागीदारांसाठी आपले धोरण खुले ठेवेल, असेही जर्मनीच्या व्यापारमंत्र्यांनी सांगितले.

जर्मनी व चीनमधील द्विपक्षीय व्यापार २४५ अब्ज युरो इतका आहे. कच्चा माल, बॅटरीज्‌‍, सेमीकंडक्टर्स यासारख्या घटकांच्या आयातीसाठी जर्मनी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेता जर्मनीने दिलेले बदलाचे संकेत महत्त्वाचे ठरतात.

leave a reply