आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची दरवाढ कायम

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरातील वाढीबाबत असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सोन्याच्या दरांनी पुन्हा प्रति औंस (२८.३३ ग्रॅम) दोन हजार डॉलर्सची पातळी ओलांडली. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या व्यवहारांमध्ये सोन्याचे दर प्रति औंस २,००७ डॉलर्स तर अमेरिकेत झालेल्या व्यवहारांमध्ये २,०२१ डॉलर्सवर गेल्याचे दिसून आले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची दरवाढ कायमएप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या व्यवहारांमध्ये सोन्याचे दरांनी उसळी घेत प्रति औंस २,०३० डॉलर्सचा टप्पा गाठला होता. अमेरिकी बाजारपेठेत सोन्याचे दर प्रति औंसामागे २,०३८ डॉलर्स असे नोंदविण्यात आले. त्यानंतरच्या २४ तासांमध्ये झालेल्या व्यवहारांमध्येही सोन्याचे दर दोन हजार डॉलर्सवर कायम राहिले होते. त्यामुळे सोन्याच्या बाजारपेठेशी निगडित विश्लेषक व तज्ज्ञांनी सोने दोन हजारवरील स्तर कायम राखेल, असे संकेत दिले होते.

सोमवारी झालेल्या सोन्याच्या व्यवहारांनी या संकेतांना दुजोरा दिल्याचे दिसत आहे. अमेरिका व युरोपातील ‘बँकिंग क्रायसिस’ पूर्णपणे संपलेला नाही. अमेरिकेतील बँकांना असलेला धोका अद्यापही कायम असल्याची भीती विविध अर्थतज्ज्ञ व विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची दरवाढ कायमअमेरिकी प्रशासनाकडून बँकांच्या सुरक्षिततेबाबत आश्वासने देण्यात येत असली तरी गुंतवणूकदारांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून करण्यात येणारी वक्तव्ये व पुढील निर्णयाबाबत असलेली अनिश्चितता यामुळे गुंतवणुकदारांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोहरा वळविण्यात आला असून त्यामुळेच सोन्याची मागणी व दरांमध्ये वाढ दिसून येत आहे. हा कल कायम राहिला तर पुढील काही महिन्यात सोन्याच्या दर प्रति औंस २,०५० ते २,१०० या टप्प्यात आलेले दिसतील, असे भाकित विश्लेषक करीत आहेत.

गेल्या चार वर्षात सोन्याच्या दरांनी तीनदा दोन हजार डॉलर्सचा स्तर ओलांडला असून काही तज्ज्ञ येत्या दशकभरात सोन्याचे दर तीन ते पाच हजार डॉलर्सपर्यंत जाऊ शकतात, असे दावे करीत आहेत.

हिंदी

 

leave a reply