सिंगापूर – ‘शीतयुद्धाची अखेर झाल्यानंतरची गेली 30 वर्षे जागतिकीकरणाचा सुवर्णकाळ होता. हा काळ आता संपला आहे. आपण नव्या पर्वात प्रवेश करीत आहोत. हे युग तीव्र भूराजकीय स्पर्धांनी भरलेले आहे. जागतिक व्यवस्थेतही मूलभूत पातळीवर बदल होत आहेत’, असा इशारा सिंगापूरचे अर्थमंत्री लॉरेन्स वाँग यांनी दिला. सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘फोर्ब्स ग्लोबल सीईओ कॉन्फरन्स’मध्ये वाँग यांनी अमेरिका व चीनमधील वाढत्या तणावाकडे लक्ष वेधले.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनविरोधात व्यापारयुद्धाची घोषणा करून निर्बंध तसेच दंड ठोठावणारे अनेक निर्णय घेतले होते. अमेरिकेनंतर युरोपिय देशांनीही चीनविरोधात कारवाईची पावले उचलली होती. अमेरिकेतील सत्ताबदलानंतर याचा वेग कमी झाला असला तरी कोरोनाची साथ व इतर कारणांमुळे पाश्चिमात्य देश आणि चीनमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी युरोपातील आघाडीची अर्थव्यवस्था असणाऱ्या जर्मनीनेही चीनबरोबरील व्यापारी संबंधांची पुनर्रचना करण्याची घोषणा केली होती.
दुसऱ्या बाजूला रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, चलनव्यवहार व संबंधित क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथी होत आहेत. रशिया व चीन सध्या प्रचलित असणाऱ्या जागतिक व्यवस्थेला आव्हान देत पर्याय उभे करण्याच्या हालचाली करीत असून त्यांनाही चांगले समर्थन मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आशियातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असणाऱ्या सिंगापूरच्या अर्थमंत्र्यांनी दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.
‘जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांनी पूर्णपणे व्यापारी संरक्षणवादाचे धोरण स्वीकारलेले नाही. पण जागतिक स्तरावरील आघाडीचे उद्योग व कंपन्यांवर भूराजकीय तणावाचे परिणाम दिसू लागले आहेत. यापूर्वी परस्परांशी व्यापार करण्यासाठी दोन्ही देशांनी मित्र असण्याची गरज नाही, असे सांगितले जात होते. किंबहुना परस्परांमधील व्यापार व गुंतवणूक वाढली की भूराजकीय पातळीवरील वैर कमी होईल, असे मानले जात होते. मात्र आता त्यात बदल झाले आहेत’, असे सिंगापूरच्या अर्थमंत्र्यांनी बजावले. यावेळी त्यांनी अमेरिकी कंपनी ‘मॅक्डोनाल्ड्’च्या सिद्धांताचाही उल्लेख केला.
जर सगळ्या देशांमध्ये मॅक्डोनाल्ड्सची दुकाने उघडली तर युद्ध होणारच नाही, असे ‘मॅक्डोनाल्ड्’च्या सिद्धांतात सांगण्यात आले होते. पण हा आता इतिहास झाला आणि तो संपलेला आहे, या शब्दात वाँग यांनी सध्याची परिस्थिती बदलल्याची जाणीव करून दिली. सध्या होणारे बदल कायमस्वरुपी झाले तर जग अधिकच धोकादायक व खंडित झालेले दिसेल, असा इशाराही सिंगापूरच्या अर्थमंत्र्यांनी दिला. यावेळी अमेरिका व चीनमधील वाढत्या तणावाकडे लक्ष वेधून जग दोन्ही देशांना सामावून घेण्याइतके मोठे आहे आणि त्यांनी परस्परांमधील संबंधांकडे प्रतिस्पर्ध्याच्या नजरेतून पाहण्याची गरज नाही, असेही त्यांनी बजावले.