नवी दिल्ली – ‘पाच वर्षांपूर्वी देशातील स्टार्टअप्सची संख्या १५० वर होती. पण आता स्टार्टअप्सची संख्या ६० हजारांवर गेली आहे. तर एक अब्ज डॉलर्सपर्यंत प्रगती करणार्या युनिकॉर्न्सची संख्या ४२ वर आहे’, असे सांगून पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या भारताच्या उभारणीतील स्टार्टअप्सचे अफाट महत्त्व असल्याचे स्पष्ट केले. यामुळे केवळ नव्या संकल्पना व संशोधन याला चालना मिळत नाही, तर यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीही होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशात स्टार्टअप्सचे सुवर्णयुग सुरू झाले आहे. अशा काळात ‘इनोव्हेटिंग फॉर इंडिया अँड इनोव्हेटिंग फ्रॉम इंडिया’कडे स्टार्टअप्सनी लक्ष केंद्रीत करावे, असा संदेश पंतप्रधानांनी दिला. स्टार्टअप सुरू करणार्या तरुण उद्योजकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिग द्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी हा संदेश दिला. देशाच्या ६२५ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी किमान एक स्टार्टअप तरी उभा राहिलेला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील स्टार्टअप्स अर्थात नव्या उद्योगांच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने तीन धोरणे स्वीकारली आहेत. यामध्ये उद्योजकतेला सरकारी प्रक्रियेच्या जाळ्यातून दूर ठेवणे व प्रशासकीय जंजाळात न अडकवण्याच्या धोरणाचा समावेश आहे. याबरोबरच संशोधन तसेच नव्या संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थागत उभारणी करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. तर नव्याने उदयाला येत असलेले उद्योजक व कंपन्यांना आधार देऊन त्यांना उत्तेजन देण्यासाठी केेंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याचे परिणाम दिसू लागल्याचे सांगून पंतप्रधानांनी त्यावर समाधान व्यक्त केले. गेल्या वर्षी देशाला २८ हजार पेटंटस् मिळाले आहेत. २०२१ सालात २.५ लाख ट्रेडमार्क्स देशातील उद्योजकांनी मिळविले आहेत. याबरोबरच गेल्या वर्षी १६ हजाराहून अधिकजणांना बुद्धिसंपदा कायद्यानुसार कॉपीराईट्स मिळाले आहेत, याची जाणीव पंतप्रधानांनी करून दिली. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये २०१५ साली ८१ व्या क्रमांकावर असलेला भारत आता ४६ व्या स्थानावर झेपावला आहे. अशा काळात स्टार्टअप्सनी केवळ स्थानिक पातळीपुरता विचार करू नये, तर वैश्विक पातळीवर विचार करावा, असा संदेश पंतप्रधानांनी दिला. देशातील स्टार्टअप्सने उद्योगक्षेत्राची स्थितीगती बदलून टाकली आहे. म्हणून स्टार्टअप्सकडे आपण नव्या भारताचा कणा म्हणून पाहत आहोत. पुढच्या काळात युनिकान्स अर्थात एक अब्ज डॉलर्सची वेस ओलांडणार्या कंपन्यांची संख्या शंभरावर जाईल असे सांगून देशातील स्टार्टअप्सचे सुवर्णयुग सुरू झाल्याचा दावा केला. १६ जानेवारी हा दिवस ‘नॅशनल स्टार्टअप डे’ म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली. देशाची अर्धी जनसंख्या ऑनलाईन आहे. हे लक्षात घेऊन ग्रामीण भागाकडेही स्टार्टअप्सनी लक्ष पुरवावे. इंटरनेट व मोबाईल, ब्रॉडबॅण्ड आणि पायाभूत सुविधांमुळे अधिक चांगल्यारितीने जोडणी झालेल्या ग्रामीण भागातील जनतेच्या आकांक्षांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण तसेच शहरीकरणाी प्रक्रिया सुरू झालेल्या भागांचा विकास होत आहे. याची स्टार्टअप्सनी दखल घ्यावी, अशी अपेक्षाही यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली.
देशात स्टार्टअप्सचे सुवर्णयुग सुरू झाले आहे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी