ग्रीसने तुर्कीच्या संयमाची परीक्षा घेऊ नये

- तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांचा ग्रीसला इशारा

तुर्कीच्या संयमाची परीक्षाइस्तंबूल/ग्रीस – एजिअन सी क्षेत्रातील सागरी हद्द वाढविण्यासारख्या चिथावणीखोर कारवायांमधून तुर्कीच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, असा इशारा तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी ग्रीसला दिला आहे. गेली दोन वर्षे ग्रीस व तुर्कीमध्ये सागरी हद्दीवरील हक्क आणि इंधन उत्खननावरून वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रीसने ‘एजिअन सी`मधील आपली हद्द सहा मैलांवरून 12 मैलांपर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे तुर्की बिथरला असून ग्रीसला सातत्याने धमकावण्यास सुरुवात केली आहे.

‘एजिअन सीमध्ये सध्या जैसे थे स्थिती आहे. ग्रीसची सागरी हद्द सहा मैलांपर्यंत आहे. त्याबद्दल त्यांनी तुर्कीचे आभार मानायला हवेत. एजिअन सीच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा दोन्ही देशांना लाभ होतो आहे व त्यात समाधानी रहायला हवे. ग्रीस आपली हद्द 12 मैलांपर्यंत वाढविण्याची चूक करणार नाही, अशी आशा आहे. याप्रकारे चिथावणी देऊन तुर्कीच्या संयमाची परीक्षा घेऊ नका`, असा इशारा तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलुसी अकार यांनी दिला. ग्रीसने आपले क्षेत्र वाढविले तर आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत प्रवेश करण्यासाठी दरवेळेस ग्रीसची परवानगी घ्यावी लागेल व ही बाब तुर्की खपवून घेणार नाही, असेही तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी बजावले.

यावेळी तुर्कीच्या मंत्र्यांनी ग्रीसकडून इतर नाटो देशांबरोबर साधण्यात येत असलेल्या जवळिकीवरही नाराजी व्यक्त केली. ‘तुर्की हा ग्रीसचा नाटोतील सहकारी देश असूनही ग्रीस इतर देशांबरोबर तुर्कीविरोधात करार करीत आहे. ही बाब नाटोच्या सामूहिक सुरक्षेच्या तत्त्वाचे उल्लंघन तुर्कीच्या संयमाची परीक्षाकरणारी आहे. नाटोतील काही देश तुर्कीविरोधात निर्णय घेत आहेत. या गोष्टी नाटोला कमकुवत करणाऱ्या आहेत`, असा आरोप हुलुसी अकार यांनी केला. ग्रीसने गेल्या काही वर्षात केलेल्या संरक्षणकरारांकडेही तुर्कीच्या मंत्र्यांनी लक्ष वेधले.

गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या विविध सर्वेक्षणांमधून भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इंधनाचे साठे असल्याचे समोर आले आहे. त्यातील अधिकाधिक साठ्यांवर ताबा मिळविण्यासाठी तुर्कीने गेल्या वर्षापासून आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस व सायप्रसच्या हद्दीतील इंधनसाठ्यांवर तुर्कीने आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. 2020 सालच्या ऑगस्ट महिन्यात व त्यानंतर तुर्कीने ‘रिसर्च शिप` तसेच युद्धनौका पाठवून भूमध्य सागरात एकापाठोपाठ मोहिमा राबविण्यास सुरुवात केली होती. तुर्कीच्या या कारवायांवर आक्षेप घेऊन ग्रीसने भूमध्य सागरातील आपली संरक्षण तैनाती वाढविली होती. त्यानंतर ग्रीसने अमेरिकेसह फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, इस्रायल, इजिप्त यासारख्या देशांबरोबर सामरिक सहकार्य मजबूत करण्यावरही भर दिला होता.

leave a reply