अथेन्स/वॉशिंग्टन – भूमध्य सागरी क्षेत्रात तुर्कीबरोबरील तणाव वाढत असतानाच ग्रीसने अमेरिकेकडून प्रगत ‘एफ-३५’ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव अमेरिकेला पाठविण्यात आल्याची माहिती ग्रीसच्या माध्यमांनी दिली. तुर्कीच्या कारवायांमुळे नाराज झालेल्या अमेरिकेने काही महिन्यांपूर्वी ‘एफ-३५’च्या प्रकल्पातून तुर्कीला बाहेरचा रस्ता दाखविला होता. या पार्श्वभूमीवर ग्रीसने ही प्रगत लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेऊन तुर्कीला जबरदस्त धक्का दिल्याचे दिसत आहे.
भूमध्य सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इंधनाचे साठे असल्याचे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण व अहवालांमधून समोर आले आहे. इस्रायल, ग्रीस, सायप्रस व तुर्कीच्या सागरी हद्दीत हे साठे असून, त्यातील अधिकाधिक क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी तुर्कीने कारवाया सुरू केल्या आहेत. भूमध्य सागरात ग्रीस तसेच सायप्रसच्या अधिकाराखाली असणार्या क्षेत्रावर आपलाच हक्क असल्याचे दावे तुर्कीकडून करण्यात येत आहेत. गेल्या काही महिन्यात तुर्कीने ‘नॅव्हटेक्स अलर्ट’ जारी करून आपले ‘ओरुक रेईस’ हे ‘रिसर्च शिप’ दोन जहाजांसह भूमध्य सागरी क्षेत्रात संशोधनासाठी तैनातही केले आहे.
आपल्या या मोहिमेचे समर्थन करण्यासाठी तुर्कीने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संरक्षणतैनाती केली असून, एकापाठोपाठ एक युद्धसराव आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. भूमध्य समुद्रात तुर्कीने केलेली विनाशिकांची तैनाती तसेच तुर्कीच्या लढाऊ विमानांच्या घिरट्या, यामुळे सदर सागरी क्षेत्रात कमालीचा तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रीसने संरक्षणदलांचे सामर्थ्य वाढविण्यासाठी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सप्टेंबर महिन्यात ग्रीसने यासाठी फ्रान्सबरोबर करारही केला होता.
या करारानुसार ग्रीस फ्रान्सकडून १८ रफायल लढाऊ विमानांसह, चार विनाशिका, नेव्ही हेलिकॉप्टर्स, अँटी टँक वेपन्स, नेव्ही टोर्पेडोज व प्रगत हवाई क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. त्यानंतर आता थेट अमेरिकेकडून ‘फिफ्थ जनरेशन फायटर्स’ म्हणून ओळखण्यात येणार्या ‘एफ-३५’च्या खरेदीचा निर्णय घेऊन ग्रीसने तुर्कीविरोधात लष्करी पातळीवर तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. ग्रीसने अमेरिकेकडे १८ लढाऊ विमानांची मागणी केली असून त्यातील सहा पूर्णपणे नवी तर १२ काही प्रमाणात वापरलेली असतील, असे सांगण्यात येते.
याबाबत चर्चाही सुरू असून विमानांची संख्या २४पर्यंत वाढू शकते, असे संकेतही ग्रीसने दिले आहेत. अमेरिकेने २०२१ पासून विमानांचा पुरवठा सुरू करावा, अशी विनंती ग्रीसकडून करण्यात आली आहे.