लिऑन/बीजिंग – जागतिक स्तरावरील पोलीस संघटना असणार्या ‘इंटरपोल’च्या कार्यकारी समितीसाठी चीनच्या अधिकार्याने जाहीर केलेली उमेदवारी वादाच्या भोवर्यात सापडली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संसद सदस्य तसेच स्वयंसेवी गटांनी चिनी अधिकार्याच्या उमेदवारीला जोरदार विरोध दर्शविला आहे. यापूर्वीच्या काळात चीनने इंटरपोलचा वापर कम्युनिस्ट राजवटीचे विरोधक तसेच धार्मिक अल्पसंख्य गटांना लक्ष्य करण्यासाठी केला, असा आरोप संसद सदस्य, स्वयंसेवी गट तसेच तज्ज्ञांनी केला आहे. यासंदर्भातील एक अहवालही नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
चीनच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असणार्या ‘मिनिस्ट्री ऑफ पब्लिक सिक्युरिटी’चे उपप्रमुख असणार्या हु बिन्चेन यांनी इंटरपोलच्या ‘एक्झिक्युटिव्ह कमिटी’च्या सदस्यपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. पुढील आठवड्यात इंटरपोलची बैठक असून यावेळी कमिटीच्या सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. बिन्चेन यांची निवड झाल्यास चीन इंटरपोलचा वापर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तसेच कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधकांवर कारवाईसाठी करेल, असे आरोप आंतरराष्ट्रीय स्तरावरुन होऊ लागले आहेत. बिन्चेन यांनी चीनमधील जबाबदारी सांभाळताना केलेल्या कारवायांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
चीनच्या कारवायांविरोधात आवाज उठविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘इंटरपार्लमेंटरी अलायन्स ऑन चायना’ या प्रभावशाली गटाने जगातील आघाडीच्या देशांना उद्देशून खुले पत्र लिहिले आहे. या पत्रावर २० देशांमधील ५० संसद सदस्यांच्या स्वाक्षर्या आहेत. ‘आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेवर पकड मिळविण्याचा चीनचा प्रयत्न ही धोक्याची घंटा आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिसचा वापर करून परदेशातील उघुरवंशियांना लक्ष्य करण्यात आले होते. बिन्चेन यांची निवड चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला दडपशाहीचे धोरण राबविण्यासाठी खुली परवानगी दिल्याचे संकेत ठरतील’, असा इशारा ‘इंटरपार्लमेंटरी अलायन्स ऑन चायना’ने दिला आहे.
या गटाव्यतिरिक्त मानवाधिकारांसाठी लढणार्या जगभरातील ४० आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही स्वतंत्र निवेदन जारी केले आहे. ‘हु बिन्चेन यांची निवड चीनमधील नागरिक, हॉंगकॉंगची जनता, तिबेटी तसेच उघुरवंशियांच्या सुरक्षेसाठी अत्यंत गंभीर बाब ठरते’, असे या निवेदनात बजावण्यात आले. हे निवेदन जगातील सर्व देशांना पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ‘इंटरपार्लमेंटरी अलायन्स ऑन चायना’चे पत्र व मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या निेवेदनाच्या पार्श्वभूमीवरच ‘सेफगार्ड डिफेन्डर्स’ या गटाने चीनकडून इंटरपोलचा गैरवापर होत असल्याचा स्वतंत्र अहवालही प्रसिद्ध केला आहे.
गेल्या दोन दशकात इंटरपोलकडून ‘रेड कॉर्नर नोटिस’चा वापर १० पटींनी वाढला असून त्यात चीनचा वाटा मोठा असल्याचे ‘सेफगार्ड डिफेन्डर्स’ने म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी आखलेल्या ‘फॉक्स हंट’ व ‘स्काय नेट’ यासारख्या मोहिमांसाठी इंटरपोलचा वापर करण्यात आल्याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी चीनने सुरक्षाकायद्यात बदल करून ‘रेड कॉर्नर नोटिस’ची माहिती जाहीर करण्याचेही नाकारले आहे. त्याचवेळी हॉंगकॉंगमध्ये लागू केलेला नवा कायदा व त्याचा वापर याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे ‘सेफगार्ड डिफेन्डर्स’ने बजावले आहे.