नवी दिल्ली – गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने 156 जागा तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने 40 जागा जिंकून बहुमत मिळविले आहे. याबरोबरच पाच राज्यांमध्ये सात विधानसभा मतदारसंघात झालेल्या झालेल्या पोटनिवडणुकीचेही निकाल जाहीर झाले.
गुजरातमधील 182 विधानसभा मतदारसंघासाठी 1 डिसेंबर व 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तब्बल 156 जागांवर विजय मिळविला. तर काँग्रेस पक्षाने 17 जागा जिंकल्या असून आम आदमी पार्टीने 5 जागा जिंकल्या आहेत. तर इतरांना 4 जागांवर विजय मिळाल्याचे सांगितले जाते.
तर हिमाचल प्रदेशमधील 68 विधानसभा मतदार संघांमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 40 जागा जिंकून बहुमत प्रस्थापित केले आहे. तर भारतीय जनता पक्षाने 25 जागांवर विजय मिळविला. तर स्वतंत्रपणे निवडणूक लढविणारे तीन उमेदवार या निवडणुकीत जिंकले आहेत.
याबरोबरच उत्तर प्रदेशमध्ये दोन जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला व राष्ट्रीय लोकदल पक्षाला प्रत्येक एका जागी विजय मिळाला. तर बिहारमध्ये एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकले आहेत. राजस्थान व छत्तीसगडमध्ये पार पडलेल्या प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला. तर ओडिशामध्ये एका विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत बिजू जनता दल पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. उत्तर प्रदेश येथील मैनपुरी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव विजयी झाल्या आहेत.