पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने हफीज सईदला ३२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

इस्लामाबाद – पाकिस्तानात फार मोठ्या राजकीय उलथापालथी होत असतानाच, या देशाच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने लक्षवेधी निकाल दिला. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या हफीज सईद याला दहशतवादविरोधी न्यायालयाने दुसर्‍या दोन प्रकरणांमध्ये ३२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. याच्या आधी दहशतवादाशी संबंधित पाच प्रकरणांमध्ये हफीज सईद याला ३६ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यामुळे हफीज सईद याचा तुरुंगवास ६८ वर्षांवर गेला आहे.

तुरुंगवासाची शिक्षालाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेची बातमी भारतीय माध्यमांनी उचलून धरली. ३६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील हफीज सईदच्या सहभागाचे पुरावे भारताने पाकिस्तानकडे सोपविले होते. पण पाकिस्तानच्या न्यायालयाने हे पुरावे अमान्य केले. मात्र आंतरराष्ट्रीय दडपणामुळे हफीज सईद याला दुसर्‍या प्रकरणांमध्ये गुंतवून तो तुरुंगवासात राहिली, याची तजवीज पाकिस्तानने केली होती. एफएटीएफच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेल्या पाकिस्तानने हफीज सईद याच्यावर इतर गुन्ह्यांचा आरोप करून आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात उजळमाथ्याने वावरून भारताला धमक्या देणारा सईद सध्या तुरुंगात असला, तरी भारताने त्याच्यावरील कारवायांवर नेहमीच संशय व्यक्त केला होता. हफीज सईद याला तुरुंगात डांबून पाकिस्तानचे सरकार व लष्कर संरक्षण पुरवित असल्याचे भारताने म्हटले आहे. तुरुंगात असलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जाते, त्यांचा तुरुंगवास हा केवळ जगाला दाखविण्यासाठी असतो, असा ठपका भारताने याआधी ठेवला होता.

गेल्याच महिन्यात भारताच्या एनआयएच्या न्यायालयाने हफीज सईद, सय्यद सलाहुद्दीन यांच्यासह काश्मिरी दहशतवादी नेत्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करून घेतले होते. त्या पार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानने हफीज सईद याच्या विरोधात केलेली ही कारवाई लक्ष वेधून घेत आहे. याद्वारे आपली प्रतिमा सुधारून आपला देश कायद्याद्वारे चालत असल्याचे दाखविण्याचा पाकिस्तान प्रयत्न करीत आहे.

हफीज सईदच्या शीरावर अमेरिकेने सुमारे एक कोटी डॉलर्सचे इनाम ठेवले होे. हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली होती. तरीही पाकिस्तानने हफीज सईदवर कठोर कारवाई करण्याचे टाळले होते. म्हणूनच सईद याला आता सुनावण्यात आलेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत.

leave a reply