वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींना हमासची चिथावणी

गाझा/जेनीन/जेरूसलेम – गेल्या तीन आठवड्यांपासून इस्रायलमध्ये सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचे स्वागत करणार्‍या हमासने वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींना चिथावणी दिली. वेस्ट बँकमधील प्रत्येक शहर आणि गावांमध्ये इस्रायली लष्कराच्या विरोधातील संघर्ष तीव्र करा, असे हमासने जाहीर केले. त्याचबरोबर इस्रायली शहरांमध्ये झालेल्या हल्ल्याची निंदा करणार्‍या तुर्की, बाहरीन या देशांवर हमासने टीका केली आहे. दरम्यान, हमास वेस्ट बँकमध्ये मोठ्या दंगली घडविण्याचा प्रयत्नात असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींनागेल्या तीन आठवड्यांमध्ये इस्रायलच्या बिरशेबा, हादेरा, बेनी ब्राक, तेल अविव आणि राहत या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले झाले. आयएस या दहशतवादी संघटनेने यातील काही हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. या हल्ल्यांमध्ये वेस्ट बँकमधील कट्टरपंथीय सहभागी असल्याचे उघड झाले होते. यानंतर इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी वेस्ट बँक व इतर भागांमध्ये केलेल्या कारवाईत दोनशेहून अधिक संशयितांना ताब्यात घेतले आहे. तशीच आवश्यकता असेल तर दोन हजाराहून अधिक जणांना अटक करण्याची घोषणा इस्रायलने केली आहे.

गुरुवारी रात्री इस्रायलची आर्थिक राजधानी तेल अविव मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे वेस्ट बँकच्या जेनीन शहरातील संशयित असल्याचे उघड झाले. यानंतर इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी जेनीनमध्ये घुसून संशयिताशी संबंधितांची धरपकड करण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिकांनी इस्रायली जवानांचा मार्ग रोखून संशयितांवर कारवाई होणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे इस्रायली जवानांना जेनीन शहरातून रिकाम्या हाताने मागे परतावे लागले.

वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींनागाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने वेस्ट बँकमधील या घटनेची दखल घेतली. जेनीनमधील स्थानिकांनी इस्रायली जवानांना पिटाळून लावले म्हणून हमासने त्यांचे स्वागत केले. इस्रायली सुरक्षा यंत्रणेच्या विरोधातील हा संघर्ष जेनीनपर्यंत मर्यादित न राहता, वेस्ट बँकेच्या इतर शहरांमध्ये आणि गावांमध्ये ठेववावा, अशी चिथावणी हमासचा प्रवक्ता फावजी बरहूम याने दिली. हमासने वेस्ट बँकमधील कट्टरपंथीयांना दिलेल्या चिथावणीची इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी दखल घेतली आहे.

दरम्यान, पॅलेस्टाईनचा भूभाग असलेल्या गाझापट्टीवर हमासचे तर वेस्ट बँकवर फताह या पक्षाचे नियंत्रण आहे. यापैकी हमासला अमेरिका, इस्रायलने दहशतवादी संघटना घोषित केले आहे. वेस्ट बँकमधील फताहकडे पॅलेस्टिनीनींचे नेतृत्व आहे. पण गेल्या वर्षभरात वेस्ट बँकमधील हमासचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी इस्रायलच्या शहरांमध्ये पेटलेल्या दंगलीनंतर हमासच्या या वाढत्या प्रभावाबाबत इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी इशारा दिला होता. हमास वेस्ट बँकमध्ये दंगली भडकावून इस्रायली सुरक्षेला मोठे आव्हान देऊ शकतो, असे इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी आणि विश्लेषकांनी बजावले होते. हमासच्या प्रवक्त्याने दिलेल्या चिथावणीनंतर, इस्रायली सुरक्षा यंत्रणेचा इशारा प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसत आहे.

leave a reply