चिमोली – उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ग्लेशियरचा भाग कोसळून हाहाकार माजला आहे. या जलप्रलयात दोन जलविद्युत प्रकल्पांबरोबर चीनच्या सीमेवर पोहोचण्यासाठी लष्कराकडून वापरला जाणारा पूल वाहून गेला आहे. जलविद्युत प्रकल्पात काम करणारे सव्वाशे कामगार बेपत्ता आहेत. आत्तापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले आहेत. धौलीगंगा, रिषी गंगा आणि अलकनंदा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे सात वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये अशाच प्रकारे आलेल्या महाभयंकर पुराच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या आपत्तीमध्ये झालेल्या जीवित व वित्तहानीचा अद्याप अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही. लष्कर, वायुसेना, एनडीआरएफची पथके मोठ्या प्रमाणावर बचावकार्यात सहभागी झाली आहेत.
रविवारी सकाळी उत्तराखंडच्या जोशीमठ जवळ नंदादेवी ग्लेशियरच्या मोठ्या भागाला तडा गेला. ही हिमनदी फुटून प्रचंड वेगाने जलप्रवाह पर्वतशिखराकडून वाहत आला. या प्रचंड प्रवाहाच्या मार्गातील आलेले सारेकाही वाहून गेले. पाण्याच्या प्रचंड वेगात एनटीपीसीचा तपोवन-विष्णुगंगा जलविद्युत प्रकल्प, तसेच रिषी गंगा जलविद्युत प्रकल्पही वाहून गेले. रिषी गंगा जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पात काम करणार्या कामगारांची घरेही याच भागात होती. ही घरेही वाहून गेली. कितीतरी कामगार बेपत्ता आहेत. काही कामगार एका भुयारात अडकून पडले असून यामध्ये चिखल भरलेला असल्याने या कामगारांची सुटका करणे अवघड बनले आहे. या कामगारांना सोडविण्यासाठी लष्कर, आयटीबीपी आणि एनडीआरएफचे जवान प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.
या जलप्रलयात डोंगर उतारावरील काही गावातही भयंकर हानी झाली असून घरे वाहून गेली आहेत. याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. या भागातील गंगेच्या उपनद्यांची पातळी वाढली आहे. त्यामुळे किनार्याकडील भागात आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमनदी फुटल्याची माहिती मिळताच उत्तराखंड सरकारने वेगाने हालचाली करून नद्यांच्या किनार्याकडील गावांना सावधानतेचा इशारा दिला व स्थानिकांना उंचावरील भागात आश्रय घेण्याची सूचना केली. नदीपात्राच्या शेजारील गावांमध्ये आधीच बचावकार्य हाती घेण्यात आल्याने इथे विशेष हानी झालेली नसल्याचे सांगितले जाते.
२०१३ साली उत्तराखंडमध्ये केदरनाथजवळ अशाच प्रकारे प्रचंड जलप्रलय आला होता व यात सहा हजार जणांचा बळी गेला होता. तसेच नदी किनार्यावरील पाच हजार गावांमध्ये हाहाकार उडाला होता. मात्र यावेळी वेगाने करण्यात आलेल्या हालचालीमुळे मोठी हानी टळली आहे, असा दावा केला जातो. पाण्याचा वेग आणि पातळी आता कमी झाली असून याचा धोका टळल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आपत्तीबाबत शोक व्यक्त केला आहे. तर या आपत्तीच्या काळात उत्तराखंडला सर्वोतोपरी सहाय्य करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे.