सिरियातील इराण, हिजबुल्लाहच्या तळांवर इस्रायलचे जोरदार हवाई हल्ले

- इस्रायली माध्यमांचा दावा

दमास्कस/तेल अवीव – सिरियाची राजधानी दमास्कस आणि दक्षिणेकडील कुनित्रा भागात इस्रायलच्या लष्कराने हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन लष्कर आणि सरकारी वृत्तसंस्थेने केला. इस्रायलच्या या हल्ल्यांना आपल्या लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे सिरियाने म्हटले आहे. मात्र इस्रायलने इराण आणि इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हे हल्ले केल्याच्या बातम्या येत असून यामध्ये इराण व हिजबुल्लाहचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतो.

बुधवारी रात्री इस्रायली वेळेनुसार अकराच्या सुमारास सिरियात जोरदार हवाई हल्ले झाले. दमास्कस आणि सिरियाच्या गोलान भागातील कुनित्रा शहरात हे हल्ले झाले. यावेळी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हवेतून जमिनीवर तसेच लष्कराने जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले, अशी माहिती सिरियन वृत्तसंस्थेने दिली. यापैकी काही क्षेपणास्त्रेच सिरियात कोसळली. सिरियन लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून इस्रायलचे हल्ले यशस्वीरित्या उधळून लावल्याचा दावा सिरियन वृत्तसंस्थेने केला.

तर सिरियातील मानवाधिकार संघटनेने या हल्ल्यांची नेमकी ठिकाणे जाहीर केली. गोलानच्या कुनित्रा येथील इराण आणि इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या लष्करी तळावर हल्ले चढविण्यात आले. तर सिरियन राजधानी दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हवाई हल्ले झाल्याचे या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे.

इस्रायली माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये, कुनित्रा आणि दमास्कस येथील इराण व हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्रांच्या तळांना लक्ष्य केल्याची शक्यता वर्तविली. या हल्ल्याच्या काही तास आधी बुधवारी दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणमधून शस्त्रास्त्रांचा साठा घेऊन इराणचे लष्करी विमान दाखल झाले होते. त्यामुळे इराणच्या या शस्त्रास्त्रांना लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई केल्याचा दावा इस्रायली माध्यमांनी केला.

या हल्ल्यांमुळे इराण व हिजबुल्लाहचे जबर नुकसान झाल्याचे बोलले जाते. तर इस्रायलच्या लष्कराने नेहमीप्रमाणे यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. याआधीही सिरियन लष्कर आणि मुखपत्राने इस्रायलवर हवाई हल्ले चढविल्याचा आरोप केला होता. २०२० साली सिरियातील ५० ठिकाणी हल्ले चढविल्याचे इस्रायली लष्कराने जाहीर केले होते.

जानेवारी महिन्यापासून इस्रायलने सिरियात चढविलेला हा चौथा हल्ला ठरतो. याआधी ७ जानेवारी रोजी दमास्कसच्या दक्षिणेकडे चढविलेल्या हल्ल्यात तीन इराणसंलग्न संघटनेचे दहशतवादी ठार झाले होते. तर त्यानंतर १३ जानेवारी पूर्व सिरियाच्या देर अल-झोर येथील इराणच्या सर्वात मोठ्या लष्करी तळावर चढविलेल्या हल्ल्यात ५७ जणांचा खातमा झाला होता. यामध्ये इराणचे जवान तसेच हिजबुल्लाह आणि इराणसंलग्न संघटनांचे दहशतवादी होते. पुढे ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर २२ जानेवारी रोजी सिरियाच्या हमा येथील हल्ल्यात चार जणांचा बळी गेला होता.

सिरियातील गृहयुद्धाच्या आड इराण व हिजबुल्लाह इस्रायलच्या विरोधात मोर्चेबांधणी करीत असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. त्याचबरोबर इस्रायलच्या सुरक्षेसाठी सिरियातील इराण व हिजबुल्लाहच्या ठिकाणांवरील हल्ले सुरू राहतील, असे इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेत्यान्याहू यांनी बजावले होते.

दरम्यान, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे प्रशासन आल्यानंतर इराणने अणुकार्यक्रमासंबंधी तसेच सिरियातील हालचाली तीव्र केल्या आहेत, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत आहेत.

leave a reply