श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षादलांनी ‘हिजबुल मुजाहिदीन’च्या पाच दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये हिजबुलच्या टॉप कमांडरचा समावेश आहे. या ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.
शोपियानमधील रिबेन भागात दहशतवादी लपून बसल्याची खबर सुरक्षा यंत्रणाना मिळाली होती. त्यानंतर या भागात लष्कराच्या ‘राष्ट्रीय रायफल्स’, ‘केंद्रीय राखीव पोलीस दल’ (सीआरपीएफ) आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपने संयुक्त शोध मोहीम हाती घेऊन या भागाला वेढा दिला. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत हिजबुलचे पाच दहशतवादी ठार झाले. यामध्ये ‘हिजबुल‘चा टॉप कमांडर फारूक असद नल्ली याचा समावेश आहे. तसेच एक पाकिस्तानी दहशतवादीही चकमकीत ठार झाला आहे.
१२ तास हे ऑपरेशन सुरु होते. यावेळी सुरक्षादलांवर काही फुटीरांकडून दगडफेकही करण्यात आली. यानंतर या शोपीयानमधील दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
गेल्याच महिन्यात हिजबुलाचा कमांडर रियाझ नायकू चकमकीत ठार झाला होता. यामुळे ‘हिजबुल’ला मोठा हादरा बसला होता. ‘हिजबुल’प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने याची कबुली दिली होती. नायकुचा सूड घेण्यासाठी जैश आणि हिजबुलने मिळून आखलेल्या पुलवामा सारख्या भयंकर हल्ल्याचा कटही सुरक्षादलांनी उधळला होता. सुरक्षा दलांनी यावर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये ८० दहशतवादी ठार केले होते. यामध्ये दहशतवादी संघटनांच्या २१ टॉप कमांडर्सचा समावेश आहे. तसेच जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे पाठीराखे आता सुरक्षादलांच्या रडारवर आले आहेत.
दरम्यान, रविवारी नियंत्रण रेषेवर पुंछच्या शहापूर केरनी, कसाब सेक्टरमध्ये, तसेच बारामुल्लात उरी सेक्टर आणि कुपवाडात केरण सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांना घुसखोरीत सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानने हा गोळीबार केला होता. लष्करातर्फे या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्याने दिली आहे.