युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना हौथी बंडखोरांनी सौदीवरील हल्ल्यांची तीव्रता वाढविली

तेहरान/रियाध – येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील जझान बंदरशहरावर हल्ला चढवून त्याचा ताबा घेतल्याचे इराणच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. यावेळी हौथी बंडखोर आणि सौदीच्या लष्करात पेटलेल्या संघर्षात मोठी जीवितहानी झाल्याचा दावा या इराणी वृत्तसंस्थेने केला. पण या दाव्याला दुजोरा मिळालेला नाही. मात्र गेल्या चोवीस तासात सौदीने हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर १७ हवाई हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत.

दोन दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या दक्षिणेकडील ‘जिझान’ प्रांताची राजधानी जझानवर हौथी बंडखोरांनी हल्ले चढविले होते. या हल्ल्यांमुळे हौथी बंडखोरांनी जझानमधील ‘अल-हथिरा’ भागावर ताबा मिळविण्यात यश आल्याचा दावा इराणच्या वृत्तसंस्थेने केला आहे. त्याचबरोबर सौदीच्या ‘अल तुवाल’ प्रांतातील लष्कराच्या ठिकाणांवर देखील हौथी बंडखोरांनी हल्ले चढविल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

जझान हे सौदीचे बंदर शहर असून या ठिकाणी परदेशी जहाजे मालवाहतुकीसाठी दाखल होतात. त्यामुळे जझान शहराबाबत इराणच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या या बातमीचे महत्त्व वाढले आहे. पण त्यावर सौदीने प्रतिक्रिया दिलेली नाही.

शनिवारी सौदी अरेबिया पुरस्कृत अरब देशांच्या लष्करी आघाडीे येमेनमधील हौथी बंडखोरांच्या ठिकाणांवर हल्ले चढविले. मरिब, अल-बायदा आणि ताईझ प्रांतातील हौथींच्या ठिकाणांवर अरब देशांच्या लष्करी आघाडीने १७ हवाई हल्ले चढविले. या कारवाईत हौथी बंडखोरांच्या ताब्यातील ११ लष्करी वाहने नष्ट केल्याचे सौदीच्या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. येमेनच्या अबेस आणि हराध जिल्ह्यांमध्ये देखील हौथी बंडखोर व येमेनच्या लष्कराचा जोरदार संघर्ष पेटला होता. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी पहाटे हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर स्फोटकांनी सज्ज ड्रोनचा हल्ला चढविला.

नागरी वस्त्यांवर केलेल्या या ड्रोनच्या हल्ल्यामुळे सौदीला मोठी जीवितहानी सोसावी लागली असती. पण सौदीच्या सुरक्षा यंत्रणांनी वेळीच कारवाई करून हौथी बंडखोरांचे ड्रोन्स पाडले. यामुळे अनर्थ टळल्याचा दावा सौदीच्या यंत्रणा करीत आहेत. युक्रेन-रशिया संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. त्याचा फायदा घेऊन हौथी बंडखोरांनी सौदीवरील हल्ले वाढविल्याचे सौदीच्या माध्यमांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षी बायडेन प्रशासनाने हौथी बंडखोरांना दहशतवाद्यांच्या यादीतून वगळले होते. अमेरिकेचे आखातातील धोरणात्मक सहकारी देश असलेल्या सौदी अरेबिया, युएई या अरब देशांच्या सुरक्षेला या हौथी बंडखोरांपासून धोका आहे. त्याचबरोबर रेड सी ते पर्शियन आखातापर्यंतच्या सागरी क्षेत्रातही हौथी बंडखोरांनी हल्ले चढविले होते. या हल्ल्यात परदेशी मालवाहू जहाजांचे नुकसान झाले होते. असे असताना बायडेन प्रशासनाने हौथी बंडखोरांना दहशतवाद्यांच्या यादीतून वगळल्याने अरब देशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. फेब्रुवारी महिन्यात हौथी बंडखोरांनी युएईची राजधानी अबु धाबीवर क्षेपणास्त्र हल्ले चढविले होते. यानंतर बायडेन प्रशासनाने हौथी बंडखोरांना पुन्हा दहशतवाद्यांच्या यादीत सामील करण्यावर विचार सुरू असल्याचे जाहीर केले. पण अजूनही बायडेन प्रशासनाने तसा निर्णय घेतलेला नाही, याकडे आखाती माध्यमे लक्ष वेधत आहेत.

leave a reply