येमेनमध्ये हौथी बंडखोरांकडून 200 जणांची हत्या

- येमेनी वृत्तसंस्थेचा गंभीर आरोप

200 जणांची हत्यासना – येमेनमधील हौथी बंडखोरांनी अपहरण केलेल्या तसेच ओलिस ठेवलेल्या जवळपास 200 जणांना अनन्वित अत्याचार करून ठार केल्याचा दावा येमेनी वृत्तसंस्थेने केला आहे. त्याचवेळी हौथी बंडखोरांनी रेड सीच्या क्षेत्रातून प्रवास करणारे युएईचे मालवाहू जहाज ताब्यात घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. यानंतर संतापलेल्या सौदी अरेबियाने हौथी बंडखोरांवर भीषण लष्करी कारवाईचा इशारा दिला.

गेल्या सात वर्षांपासून येमेनचे राष्ट्राध्यक्ष अब्दरुब्बा मन्सूर हादी यांच्या सरकारविरोधात बंड पुकारुन गृहयुद्ध छेडणारे लष्करप्रमुख अन्सरुल्लाह हौथी यांच्या समर्थकांनी येमेनचा ताबा घेण्यासाठी संघर्ष पुकारला होता. त्यांच्यामागे इराणचे पाठबळ असल्याचे आरोप केले जातात. तर सौदी अरेबिया आणि मित्रदेश मात्र हादी यांच्या सरकारच्या बाजूने राहिले असून त्यांनी येमेनच्या हौथी बंडखोरांवर लष्करी कारवाई सुरू केली होती. त्यांच्या हल्ल्याविरोधात हौथी गेली सात वर्षे हौथी बंडखोर स्थानिक तसेच राजकीय विरोधकांना कैद करून त्यांचा मानवी ढालीसारखा वापर करीत असल्याचे आरोप होत आहेत.

हौथी बंडखोरांनी आपल्या प्रशिक्षण तळांवर, मुख्यालयात तसेच शस्त्रास्त्रांच्या गोदामात या अपहृतांना मानवीढाल म्हणून कैद केल्याचा आरोप येमेनी सरकारची वृत्तसंस्था ‘सबा`ने केला. या अपहृतांपैकी 200 जणांची उपासमार घडवून आणि त्यांनी वैद्यकीय सुविधा नाकारून हौथी बंडखोरांनी या निरपराधांची हत्या घडविल्याचा ठपका ‘सबा`ने आपल्या बातमीत ठेवला आहे.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हौथी बंडखोरांनी रेड सीच्या सागरी क्षेत्रातून प्रवास करणाऱ्या युएईच्या मालवाहू जहाजाचे अपहरण केले. सदर जहाज सौदीच्या जिझान बंदराच्या दिशेने प्रवास करीत असताना हौथी बंडखोरांनी ही कारवाई केली. या जहाजात शस्त्रास्त्रे होती, असा आरोप हौथी बंडखोरांनी केला आहे. हौथी बंडखोरांनी अरब मित्रदेशाच्या जहाजावर केलेली कारवाई बेजबाबदार असल्याचा ठपका सौदीने ठेवला.

200 जणांची हत्याया कारवाईने आंतरराष्ट्रीय जलवाहतूक धोक्यात टाकणाऱ्या हौथी बंडखोरांवरील लष्करी कारवाई अधिकच तीव्र केली जाईल, असा इशारा सौदीने दिला आहे.

याआधी हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या प्रमुख शहरांवर तसेच इंधनप्रकल्पांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. यानंतर सौदी व मित्रदेशांच्या आघाडीने हौथी बंडखोरांवर घणाघाती हल्ल्याचे सत्र सुरू केले. या संघर्षात येमेनची जनता होरपळत असून इथे भयंकर मानवी आपत्ती आल्याचा दावा सदर क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना करीत आहेत. मात्र इराण व सौदी यांची रणभूमी बनलेल्या येमेनमध्ये सुरू असलेला भीषण संघर्ष थांबण्याची शक्यता सध्या तरी दृष्टीपथात नाही.

leave a reply