सौदीत दहशतवादी हल्ले चढविणार्‍या हौथींवर कारवाई करा

- ‘जीसीसी’ची आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मागणी

रियाध/सना – ‘सौदी अरेबियाच्या इंधनप्रकल्पांवर तसेच येमेनी जनतेवर हल्ले चढविणार्‍या हौथी बंडखोर आणि त्यांच्या पाठिराख्यांवर आंतरराष्ट्रीय समुदायाने कारवाई करावी’, अशी मागणी ‘गल्फ कोऑपरेशन काऊन्सिल-जीसीसी’ने केली. त्याचबरोबर हौथींविरोधात सौदीने स्वीकारलेल्या भूमिकेला संघटनेचा पूर्ण पाठिंबा असेल, अशी घोषणाही ‘जीसीसी’ने केली. दरम्यान, सौदीच्या अराम्को इंधनप्रकल्पावर पुन्हा ड्रोन हल्ले चढविल्याचे हौथी बंडखोरांनी जाहीर केले आहे.

सौदी, युएई, बाहरिन, कुवैत, कतार आणि ओमान या पर्शियन आखाती देशांचा समावेश असलेल्या ‘जीसीसी’ सदस्य देशांच्या नेत्यांची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत येमेनमधील हौथी बंडखोरांकडून सौदीच्या इंधनप्रकल्प, लष्करी तसेच प्रवासी तळांवर होणार्‍या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांवर ताशेरे ओढले. हौथींनी सौदीच्या पूर्वेकडील ‘रास तनूरा’ येथील इंधनतळावर चढविलेल्या हल्ल्यावर यावेळी तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली.

सौदीवर हे हल्ले चढविणार्‍या हौथी बंडखोर आणि त्यांच्या पाठिराख्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे, ही आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी असल्याचे जीसीसीने बजावले. रास तनूरा तसेच धहरान या इंधनतळांवर ड्रोन व बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले सागरीमार्गाने चढविण्यात आले होते, असे सांगून जीसीसीने सौदीवरील या हल्ल्यांसाठी हौथींना समर्थन देणार्‍या इराणला जबाबदार धरल्याचे दिसत आहे. पण जीसीसीने यावेळी उघडपणे इराणचा उल्लेख करण्याचे टाळले.

याशिवाय हौथी बंडखोरांच्या ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांना ज्याप्रकारे सौदीकडून प्रत्युत्तर दिले जात आहे, त्याची तारीफ जीसीसीने केली. तसेच या दहशतवादी हल्ल्यांविरोधात जीसीसी सौदीच्या पाठिशी असल्याची घोषणाही आखाती देशांच्या या संघटनेने केली. या घोषणेला काही तास उलटत नाही तोच हौथींनी सौदीच्या अराम्को इंधनप्रकल्पावर सहा ड्रोन हल्ले चढविले. हौथींनी शुक्रवारी या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. हौथींनी सौदीच्या नेमक्या कोणत्या भागात हे हल्ले चढविले, याची माहिती दिली नाही. सौदीने देखील याबाबत खुलासा केलेला नाही. दरम्यान, २०१५ सालापासून हौथी बंडखोरांनी येमेनमध्ये भूसुरुंग पेरून घडविलेल्या स्फोटांमध्ये ९०० हून अधिक जणांचा बळी गेला असून यात २३०० हून अधिक जण जखमी झाल्याचा दावा स्थानिक संघटना करीत आहेत.

leave a reply