अबु धाबी – ‘इराण अणुबॉम्बच्या निर्मितीत यशस्वी ठरला तर त्यानंतरच्या परिस्थितीबाबत सौदी अरेबिया कुठलीही हमी देऊ शकत नाही. सौदी अजिबात शांत बसणार नाही. इराणचे शेजारी देश आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलतील’, असा इशारा सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सौद यांनी दिला. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिलेल्या माहितीकडे लक्ष वेधून सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराण तसेच अणुकरारासाठी पुढाकार घेणाऱ्या अमेरिकेला बजावल्याचे दिसत आहे.
इराणने 2015 सालच्या अणुकराराचे उल्लंघन करून संवर्धित युरेनियमची संख्या मर्यादेपेक्षा वाढविल्याचा दावा अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रॉसी यांनी गेल्या आठवड्यात केला होता. युरेनियम संवर्धनाचा वेग असाच कायम राहिला तर इराण लवकरच अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले साहित्य मिळविण्याच्या जवळ पोहोचेल, असा इशारा ग्रॉसी यांनी दिला होता. यानंतर इस्रायलने इराणविरोधी कारवाईचे संकेत दिले होते.
अशा परिस्थितीत, युएईची राजधानी अबु धाबी येथे आयोजित ‘वर्ल्ड पॉलिसी कॉन्फरन्स’मधील मुलाखतीत सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांनी अणुऊर्जा आयोगाच्या या इशाऱ्याकडे लक्ष वेधले. ‘आम्हाला अणुबॉम्बची निर्मिती करायची नाही, असे इराण ओरडत आहे. पण अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत दिलेले संकेत चांगले नाहीत. त्यामुळे इराणच्या या दाव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही’, असे प्रिन्स फैझल म्हणाले.
येत्या काळात इराण अणुबॉम्बच्या निर्मितीत यशस्वी झालाच तर सौदी त्यापुढील परिस्थितीची हमी देणार नसल्याचे सांगून प्रिन्स फैझल यांनी इराणच्या विरोधातील लष्करी आघाडीचे संकेत दिल्याचे दिसत आहे. याआधी अमेरिकेने इराणबरोबरचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी सुरू केलेल्या वाटाघाटींना सौदीने समर्थन दिले होते. पण या वाटाघाटी फसल्याने, यापुढे सौदी अमेरिकेच्या या भूमिकेचे समर्थन करणार नसल्याचे सौदीचे परराष्ट्रमंत्री सर्वांच्या लक्षात आणून देत आहेत.