नवी दिल्ली – आपल्याकडे जगातील सर्वात सामर्थ्यशाली लष्कर असल्याचा भ्रम काही देशांना झाला होता. मात्र गेल्या काही महिन्यात ‘इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी'(आयटीबीपी) या देशांचा हा भ्रम तोडून टाकला’, असा टोला लगावून केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी चीनला लक्ष्य केले. गृह राज्यमंत्र्यांची ही विधाने चीनच्या मानसिक दबावतंत्राच्या डावपेचांना भारत भीक घालणार नसल्याचे दाखवून देत आहेत.
शनिवारी ‘आयटीबीपी’चा स्थापना दिन होता. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संचलन सोहळ्याला संबोधित करताना गृहराज्यमंत्री रेड्डी यांनी चीनला भारताच्या संरक्षणदलाच्या सामर्थ्याची जाणीव करुन दिली. ”शत्रू कधीही आणि कुठेही डोके वर काढू शकतो. त्यामुळे कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असायला हवे. देशाच्या युद्धसज्जतेच्या दृष्टीने ‘आयटीबीपी’ महत्त्वाचा स्तंभ आहे’, असे रेड्डी म्हणाले.
भारत ‘वसुधैव कुटुंबकम’ तत्वावर विश्वास ठेवतो. मात्र आमच्या देशाची संस्कृती आम्हाला शास्त्र आणि शस्त्र या दोघांची पुजा करायला शिकवते, याकडे लक्ष वेधताना आपल्याकडे शक्तिशाली लष्कर असल्याचा काही देशांचा भ्रम ‘आयटीबीपी’च्या जवानांनी गेल्या काही महिन्यात तोडला आहे, असे गृहराज्यमंत्री म्हणाले. थेट उल्लेख केला नसला तरी आपल्या सामर्थ्याच्या कैफात राहून भारतावर हल्ला चढविणाऱ्या चीनच्या लष्कराला भारतीय सैनिकांनी शिकविलेल्या धड्याचा संदर्भ गृहराज्यमंत्र्यांच्या विधानातून देण्यात आला आहे.
गलवान व्हॅलीतल्या ‘आयटीबीपी’ च्या जवानांच्या शौर्यावर देशाला आणि देशवासियांना गर्व असल्याचे रेड्डी म्हणाले. भारत – चीनच्या ३,४४८ किलोमीटर सीमेचे ‘आयटीबीपी’चे जवान रक्षण करतात. या सीमेवर ‘आयटीबीपी’च्या नव्या ४७ अतिरिक्त बॉर्डर पोस्टस् उभारणार असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. तसेच ‘आयटीबीपी’ला अधिक कार्यक्षम आणि आधुनिक करण्यासाठी सरकार पावले उचलत असल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘आयटीबीपी’ने सीमेवर संवादासाठी ‘व्ही- सॅट’ यंत्रणा उभारल्याचे आयटीबीपीचे महासंचालक एस.एस. देस्वाल म्हणाले. तसेच ‘आयटीबीपी’ने भारत चीन सीमेवर रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविल्याची,माहितीही त्यांनी दिली. गृहमंत्रालयाने हा प्रस्ताव मंजूर केल्यास अरुणाचल प्रदेशमध्ये रस्ते बांधणीचे काम सुरु होईल, असे देस्वाल पुढे म्हणाले. भारत-चीन सीमेवर ‘आयटीबीपी’च्या जवानांनी दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना सन्मानित केले जाईल, असे देस्वाल म्हणाले.