इंडिया गेट येथील अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्धस्मारकातील ज्योतीमध्ये विलिन

नवी दिल्ली – दिल्लीच्या इंडिया गेट येथे १९७२ साली शहीद भारतीय जवानांना आदरांजली देण्यासाठी प्रज्वलीत करण्यात आलेल्या अमर जवान ज्योतीला शुक्रवारी राष्ट्रीय युद्धस्मारकातील शाश्‍वत ज्वालेत विलिन करण्यात आले. २०१९ साली राष्ट्रीय युद्धस्मारकाचे राष्ट्रार्पण करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर झालेली युद्ध व संघर्षात सर्वोच्च बलिदान देणार्‍या शहीदविरांची नावे येथे कोरलेली आहेत. या स्मारकाच्या लोकार्पणानंतर राष्ट्रीय दिनासह सर्व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन येथेच करण्यात येत आहे. त्यामुळे आता स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू असताना आणि ७३ व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी गेल्या ५० वर्षांपासून इंडिया गेट येथे तेवत असलेल्या अमर जवान ज्योतीचे युद्धस्मारकातील अमर जवान ज्योतीत विलय केला गेला आहे.

इंडिया गेट येथील अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्धस्मारकातील ज्योतीमध्ये विलिनशुक्रवारी संपूर्णपणे लष्करी इंतमामात हा कार्यक्रम पार पडला. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीमधील अग्नी येथूनच जवळ असलेल्या राष्ट्रीय युद्धस्मारकामध्ये आणण्यात आला व अग्नी येथील अमर जवान ज्योतीत विलिन करण्यात आला. भारतीय शहीद विरांचे युद्धस्मारक असावे, ही संरक्षणदलांची जुनी मागणी होती. यानुसार केंद्र सरकारने एक भव्य युद्धस्मारक दिल्लीत उभारले असून २०१९ सालात त्याचे राष्ट्रार्पण झाले होते. येथे १९४७ सालापासून हौतात्म्य स्वीकारलेल्या २६ हजाराहून अधिक जवानांची नावेही कोरलेली आहेत. तसेच भविष्यातील विचार करून सर्व बांधणी करण्यात आली आहे. तसेच येथे भव्य युद्ध संग्रहालयही येथे उभे राहत आहे.

इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीची स्थापना ही १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आली होती. या युद्धात शहीद झालेल्या तीन हजार ८४३ जवानांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले होते. मात्र तेथे या जवानांची नावे कोरलेली नाही. इंडिया गेट येथील मूळ स्मारक हे ब्रिटिशांनी बांधले होते. येथे ब्रिटीश काळात पहिल्या व दुसर्‍या, तसेच अफगाण युद्धात ब्रिटीश सैनिकांसाठी लढताना शहीद झालेल्या भारतीय जवानांची नावे कोरलेली आहेत.

इंडिया गेट येथील अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्धस्मारकातील ज्योतीमध्ये विलिनमात्र तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या युद्धस्मारकात स्वतंत्र भारतासाठी बलिदान देणार्‍या सर्वच वीर जवानांची नावे कोरलेली असून येथे उभ्या करण्यात आलेल्या विशाल स्तंभाखाली अमर ज्योत पेटविण्यात आली आहेत. त्यामुळे इंडिया गेट येथे १९७२ साली प्रज्वलित करण्यात आलेली ज्योत हलवून आता युद्धस्मारकातील अखंड तेवत राहणार्‍या ज्योतीमध्ये विलिन करण्यात आली. अनेक आजी माजी लष्करी अधिकार्‍यांनी याचे स्वागत केले आहे. कित्येक देशांची स्वत:ची युद्धस्मारके आहेत. मात्र भारतात अशी उभारणी झाली नव्हती. ब्रिटीशांनी उभ्या केलेल्या स्मारकातच अमर जवान ज्योत तेवत होते. आता तीला राष्ट्रीय युद्धस्मारकातील अमर जवान ज्योतीच्या रुपात योग्य स्थान मिळाले आहे, अशी भावना काही वरीष्ठ माजी लष्करी अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, २३ जानेवारीला नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस साजरा केला जाणार आहे. इंडिया गेट परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा उभारली जात असून या प्रतिमा उभारल्या जात असणार्‍या बुरुजांवर होलोग्राम प्रतिमेचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. येथे पुतळा तयार होईपर्यंत ही होलोग्राम प्रतिमा तशीच असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

leave a reply