अमेरिकेचे महागडे इंधन रशियन गॅसची जागा घेणे अशक्य

- हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर ऑर्बन

व्हिक्टर ऑर्बनबुडापेस्ट  – रशियाने युक्रेनवर चढवलेल्या हल्ल्यामुळे युरोपीय देशांचे इंधनाचे संकट अधिकच तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने युरोपिय देशांसाठी आपल्याकडचा इंधनसाठा खुला करण्याची घोषणा केली. पण बायडेन प्रशासन चढ्या दराने इंधनाचा पुरवठा करीत असल्याची कुरबूर युरोपीय देशांमध्ये वाढू लागली आहे. हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर ऑर्बन यांनी उघडपणे ही बाब लक्षात आणून दिली. रशियन गॅसला पर्याय म्हणून अमेरिकेकडून महागड्या दरात इंधनाची खरेदी करणे, काही देशांना पटणारे नाही, अशा परखड शब्दात ऑर्बन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

युक्रेनमधील युद्धाला ३९ दिवस उलटले असून रशियाचे हल्ले वाढल्याचा दावा केला जातो. याबरोबर युरोपिय देशांवरील इंधन संकट अधिकच तीव्र होत असून लवकरच रशियाकडून युरोपिय देशांना होणारा इंधन पुरवठा खंडित केला जाईल, अशा बातम्या समोर येत आहेत. याचा फायदा घेऊन अमेरिकेने युरोपिय देशांना पर्यायी इंधन पुरवण्याचे घोषणा केली आहे. पण युरोपिय देशांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अमेरिका महाग किमतीत इंधन पुरवित असल्याची तक्रार युरोपमधील काही माध्यमे व गट करीत आहेत.

हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर ऑर्बन यांनी स्थानिक रेडिओवाहिनीशी बोलताना ही तक्रार केली. रशियाकडून मिळणार्‍या स्वस्त गॅस पुरवठ्याकडे पाठ फिरवून अमेरिकेकडून महाग किमतीत इंधनाची खरेदी करणे हंगेरीला परवडणारे नाही, असे ऑर्बन यांनी ठासून सांगितले. नजिकच्या काळात किमान हंगेरीसाठी रशियन गॅस पुरवठ्याला अजिबात पर्याय दिसत नाही, असे ऑर्बन यांनी फटकारले. रशियाकडून मिळणारा गॅस पुरवठा खंडित झाला तर हंगेरी पुढचा विचारच करू शकत नाही, अशी चिंता ऑर्बन यांनी व्यक्त केली.

व्हिक्टर ऑर्बनरशिया-युक्रेनमधील युद्धात हंगेरीने आत्तापर्यंत तटस्थ भूमिका घेतली आहे. रशियाने युक्रेनवर चढवलेल्या हल्ल्यांवर ऑर्बन यांनी याआधी टीका केली होती. ‘हे हंगेरीचे युद्ध नाही आणि यामध्ये दखल देऊन हंगेरी ते जिंकून देऊ शकत नाही. पण या युद्धात हंगेरी आपले सर्वस्व गमावू शकतो’, असे सांगून ऑर्बन यांनी या युद्धात युक्रेनला कुठल्याही प्रकारचे शस्त्र पुरवठा न करण्याचे जाहीर केले होते. ऑर्बन यांची ही भूमिका रशियाधार्जिणी असल्याची टीका युरोपिय देशांमधून झाली होती.

दरम्यान, हंगेरीमध्ये रविवारी संसदीय निवडणुकीसाठी मतदान होत आहे. काही दिवसांपूर्वी हंगेरीमध्ये पार पडलेल्या सर्वेक्षणात ऑर्बन यांना आघाडी असल्याचे समोर आले होते. पण युक्रेन सायबर हल्ल्याद्वारे आपल्या देशातील निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पंतप्रधान ऑर्बन यांनी केला होता. युक्रेनला शस्त्रसाठा नाकारणार्‍या ऑर्बन यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागेल, असा दावा युरोपिय माध्यमे करीत आहेत.

leave a reply